प्रवीण देसाई, कोल्हापूर
Kolhapur News : तलाठ्यांना आता सज्जाच्या मुख्यालयातील उपस्थितीबाबत माहिती जाहीर करावी लागणार आहे. त्यांचे दौरे, बैठका, कार्यक्रम याबाबतच्या माहितीचे तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय येथे नागरिकांना दिसतील अशा पध्दतीने लावावे लागणार आहेत. तलाठी जागेवर नाही म्हणून नागरिकांची कामे खोळंबू नयेत, यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
तलाठी हे क्षेत्रीयस्तरावरील सर्व सामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पद आहे. नागरिकांना आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांची कामे ही तलाठ्यांकडूनच होतात. तसेच शेतक-यांशी निगडित पीक पाहणीची माहिती ई-पिक पाहणी या मोबाईल अॅपद्वारे नोंदणी करणे, नुकसानीचे पंचनामे करणे, दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती आदी प्रसंगी मदत व पुर्नवसनाचे काम करणे यासाठी तलाठी हा अतिशय महत्वाचा दुवा आहेत. परंतु हे तलाठी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी, नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून सरकारकडे करण्यात आल्या आहेत. परंतु राज्यात तलाठ्यांची पदे रिक्त असल्याने एका तलाठ्याकडे एकापेक्षा अधिक तलाठी सज्जांचा पदभार असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय थांबून नागरिकांची कामे वेळेत होण्यासाठी सज्जाच्या ठिकाणी ठराविक वेळेत तलाठ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार तलाठ्यांनी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबतचे वेळापत्रक ग्रामपंचायत कार्यालयांसह अन्य सरकारी कार्यालयांमध्ये लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर हे वेळापत्रक संबंधित मंडल अधिकारी व नायब तहसीलदार यांनाही पाठविण्याबाबत कळविण्यात आले आहे.
…तर मंडल अधिकारी, नायब तहसीलदारांशीही संपर्क साधता येणार
तलाठी आपल्या कार्यालयात आहेत कि नाही ? किंवा बाहेर दौर्यावर आहेत, याची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी तलाठ्यांनी आपला दुरध्वनी व मोबाईल क्रमांक कार्यालयाबाहेर दर्शनी भागात फलकावर नोंद करावा लागणार आहे. तसेच संबंधित सज्जाचे मंडल अधिकारी व नायब तहसीलदार यांचे नांव दूरध्वनी व मोबाईल क्रमांकही त्यासोबत दर्शवावेत, असे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत.