आशिष आडिवरेकर, कोल्हापूर
Kolhapur News : कारागृहामध्ये मोबाईल सापडण्याच्या घटना वारंवार घडत आहे.या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृह विभाग व कारागृह प्रशासनाने एक महत्वपूर्ण पाउल उचलले आहे.कारागृहातून बंदीजनांना घरच्यांसोबत संवाद साधण्यासाठी स्मार्ट कार्ड फोन कम्युनिकेशन योजना सुरु केली आहे.पायलट प्रोजेक्ट म्हणून येरवडा कारागृहात हा प्रोजेक्ट राबविण्यात येणार असून, लवकरच संपूर्ण राज्यभर हा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे.या येजनेअंतर्गत कारागृहातील प्रत्येक बंदीजनास एक स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे.
राज्यभरामध्ये 60 कारागृहामध्ये 40 हजार स्त्राr, पुरुष बंदीजन आहेत. कारागृहात विविध गंभीर गुह्यातील आरोपी आहेत. मोका अंतर्गत कारवाई, सराईत गुंडाच्या टोळ्या,खून,दरोडा, मारामारी,अपहरण यासह अनेक बंदीजन कारागृहात आहे. कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या बंदीजनांना त्यांच्या नातेवाईकांना महिन्यातून एकदा भेटण्याची मुभा असते.तसेच त्यांना कारागृहातून नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी पुर्वी कॉईन बॉक्सची व्यवस्था होती. मात्र कॉईन बॉक्स आउटडेटेड झाल्यामुळे विभाग व कारागृह प्रशासनाच्या वतीने नवीन स्मार्ट कार्ड कम्युनिकेशन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या अंतर्गत कारागृहातील प्रत्येक कैद्यास स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे.या स्मार्टकार्डवर प्रत्येक महिन्यासाठी 40 रुपयांचा बॅलेन्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रत्येक मिनीटासाठी 1 रुपयाप्रमाणे चार्ज आकारला जाणार आहे. प्रत्येक आठवड्यासाठी जास्तीत जास्त 10 मिनीटेच बोलण्याची मुभा देण्यात येणार आहे. यासाठी कारागृहातील प्रत्येक सर्कलमध्ये स्मार्ट टेलिफोन बसविण्यात येणार आहे.
अशी आहे योजना
– कारागृहाकडून बंदीजनांना स्मार्टकार्ड दिले जाणार
– 1 मिनीटासाठी 1 रुपया आकारला जाणार
– एका महिन्यासाठी 40 रुपयांचे रिचार्ज
– आठवड्यातून 10 मिनीटे असे महिन्यासाठी 40 रुपये वापरता येणार
– नातेवाईक, किंवा वकील असे तीनच नंबर स्मार्टकार्डवर अॅड केले जाणार
– तीन नंबरचे व्हेरीफीकेशन पोलीस करणार
एका महिन्यात 40 रुपयेच
कारागृहातील प्रत्येक बंदीजनास एक स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. या स्मार्टकार्ड द्वारे प्रत्येक कैद्यास फोन कॉल करणे शक्य होणार आहे. हे स्मार्ट कार्ड इन्सर्ट करण्यासाठी एक टेलिफोनीक उपकरण प्रत्येक सर्कलमध्ये बसविण्यात येणार आहे. यामध्ये हे स्मार्टकार्ड घालून बंदीजन आपल्या नातेवाईकांशी किंवा त्याने दिलेल्या 3 क्रमांकासोबत संपर्क साधून संवाद साधू शकतात.
तीन नंबरवर संपर्क करता येणार
नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी कैद्यांनी कारागृह प्रशासनाकडे तीन नंबर देणे गरजेचे आहे. हे तीन नंबर ज्या पोलीस स्टेशनच्या संबंधीत असतील त्या पोलीस स्टेशनकडून या नंबरचे व्हेरिफीकेशन केले जाणार आहे. यानंतरचे हे नंबर स्मार्टकार्डमध्ये समाविष्ठ केले जाणार आहेत. रक्ताचे नातेवाईक, पत्नी किंवा वकील यांचेच नंबर या स्मार्टकार्डमध्ये समाविष्ठ करण्याची मुभा असणार आहे.
केव्हाही फोन करता येणार
क्षणिक रागातून हातातून एखादी चुक घडते, आणि याची शिक्षा कारागृहात आयुष्य व्यथित करुन भोगावी लागते. मात्र यानंतर आयुष्यभर पश्च्यातापाची वेळ येते. यामुळे कैद्यांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवून त्यांना शिक्षा भोगल्यानंतर चांगले आयुष्य जगता यावे यासाठी कारागृहाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून हा स्मार्ट फोन कम्युनिकेशन उपकरण आहे. हे उपकरण पुढील काळात कारागृहातील प्रत्येक बॅराकमध्ये बसविण्यात येणार आहे. यामुळे बंदीजनांना रात्री अपरात्री केव्हाही आप्तजनांशी संपर्क साधता येणार आहे.
कारागृहामध्ये असणाऱ्या प्रत्येक बंदीजनांची मानसिकता भिन्न असते. या मानसिकतेमध्ये बदल घडविण्यासाठी त्यांचा नातलगांशी संवाद आवश्यक असतो. यासाठीच ही नवीन स्मार्टकार्ड फोन व्यवस्था कारागृह प्रशासनाने सुरु केली आहे. लवकरच संपूर्ण राज्यातील कारागृहांमध्ये ही व्यवस्था सुरु करण्यात येणार आहे. यामुळे बंदीजनांची मानसिकता सकारात्मक होण्यास मदत होईल.
स्वाती साठे, उपकारागृह महानिरीक्षक