दक्षिण भारतीय केरळ बांधवांतर्फे फोंडय़ात ओणम उत्सव : 13 मल्य़ाळम संस्थातर्फे राजीव गांधी कला मंदिर येथे आयोजन
प्रतिनिधी /फोंडा
गोवा आणि केरळच्या संस्कृतीमध्ये सर्वाधिक साम्यता आढळत असून गोव्यात साजरा होणाऱया ‘कणसाच्या फेस्त’ प्रमाणे केरळवासियांचा हजारो वर्षाचा इतिहास असलेला बळी राजाच्या आगमननिमित्त ओणम उत्सव साजरा करण्यात येतो. गोव्याच्या मुक्तीनंतरच्या काळात राज्यात इंग्रजी भाषेसाठी प्राध्यापक मिळवून देण्यात केरळने शैक्षणिक क्षेत्रासह अभियांत्रिक कौशल्यातही सहभाग दर्शवून राज्य विकासासाठी महत्वाचे योगदान दिल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान कृषी मंत्री रवी नाईक यांनी केले.
फोंडा येथील राजीव कला मंदिर येथे दक्षिण भारतीय केरळ मल्य़ाळम भाषिक समाजबांधवानच्या फांऊडेशन ऑफ गोवा मल्याळम असोसिएशनतर्फे ओणम उत्सव 2022 निमित्त आयोजित खास कार्यक्रमात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. राज्यातील विविध तालुक्यात कार्यरत असलेल्या सुमारे 13 सांस्कृतिक मल्याळम संस्थाचा असोसिएशनमध्ये सहभाग आहे. आजच्या घडीला देश प्रथम या भावनेने कार्य करणे महत्वाचे आहे. शेजारील राज्याचा सांस्कृतिक वारसा जपताना राज्यात 30 ऑगस्टपासून प्रारंभ होणाऱया ओणम उत्सवात गोमंतकीयांनी ओणम उत्सवात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रवी नाईक यांनी केले.
राज्यपालांचा केरळवासियांसाठी ऑडीओ संदेश
मुख्यमंत्र्यांनी हजर राहून दिल्या मल्याळम बांधवांना शुभेच्छा
प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल श्रीधरन पिल्लई उपस्थित राहणार होते. मात्र आकस्मित गुजरात येथे जावे लागल्याने ते उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी आपल्या मल्याळम भाषेत समाजबांधवांसाठी ऑडीओ संदेश देत ओणम उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. समारंभानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपाचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे खास कला मंदिर येथे हजेरी लावून ओणमच्या शुभेच्छा दिल्या. केरळ व गोव्याच्या सांस्कृतिक साम्य सांगत गणेश चतुर्थी व ओणमचे महत्व सांगितले. तसेच साखळी येथील त्रिपुरारी पोर्णिमेचे सांगडोत्सव व केरळ येथील सणानिमित्त होणारे सर्प नौका शर्यतीच्या आयोजनाबद्दलही साम्यधर्म नमूद केला. ओणम शेतकऱयासाठी विशेष महत्वाचा सण असून बळी राजा वर्षातून एकदा आपल्या प्रजेला पाहण्यासाठी येतो, त्याच्या आगमनासाठी ओणम सण साजरा करण्यात येतो. दोन्ही राज्यातील सणानिमित्त होणारी सांस्कृतिक देवाणघेवाण उत्साहात साजरी व्हावी असे डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष वासू नायर, सरसचिव लक्ष्मनन कस्तूरी, खजिनदार बिबू जोसेफ तसेच केरळ समाजन पणजी, केरळ कल्चरल असोसिएशन वास्को, केरळ समाजन वास्को, केरळ कलाकेंद्रम मडगांव, गोवा मल्याळम कल्चरल असोसिएशन फोंडा, कलकपा कल्चरल असोसिएशन डिचोली, केरळ समाजन कुडतरी, केरळ संगमन पणजी, केरळ संगमन मडगांव, कैरली कल्चरल असोसिएशन कळंगुट, प्रोगेसिव्ह आर्ट ऍन्ड कल्चरल असोसिएशन कुडचडे, पणजी मलळय़ायी असोसिएशन पणजी, केरळ संगम जुवारीनगरसह मल्याळम मिशन केरळ सरकार या संस्था ओणम उत्सवात सहभागी झाल्या होत्या.
कृषीमंत्री रवी नाईक यांच्याहस्ते दिप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मल्याळम बांधव शिक्षकांचा मंत्री नाईक यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक वासु नायर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मल्याळम व इंग्रजी भाषेतून जॉर्जकुट्टी यांनी केले. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्सवाची सांगता झाली.









