सांस्कृतिक प्रतिनिधी /फेंड़ा
नाट्यावेड्या गोमंतकाने नाट्यासेवेची परंपरा सर्वार्थाने जपली आहे. संगीत नाटकाबरोबरच गद्य नाटकातील भुमिकांमधून स्वत:ला सिद्ध केलेले अनेक नाटयकर्मी आणि रंगकर्मी गोव्याच्या खेड्यापाड्यात विखुरले आहे म्हणूनच नाट्याकलाकारांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली पाहिजे. सांस्कृतिक क्षेत्र टिकवण्यासाठी अशा कलाकारांचे योगदान मौलीक असते असे प्रतिपादन गायक तथा नाटयकर्मी दुर्गाकुमार नावती यांनी केले.
कुंडई पुरसाभाट येथील श्रीकृष्ण मंदिराच्या प्रांगणात गोपालकृष्ण नाट्यासमाजाने आयोजित केलेल्या नाट्याकलाकारांच्या सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आरोग्यधिकारी डॉ. दिपाली नाईक, संस्थेचे पदाधिकारी कमलाकांत गावडे, वामन सतरकर, पंचसदस्य संदीप जल्मी, तुळशीदास सतरकर, व मोहन सतरकर उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते दिप प्रज्ज्वलन झाले. त्यानंतर देमू गावडे, शाणू सतरकर, भालचंद्र गावडे, सुर्यकांत गावडे, जयवंत नाईक, व्यंकटेश कुवेलकर, वासुदेव कुवेलकर, गुरूदास फडते, तुळशीदास सतरकर, वामन सतरकर, मोहन सतरकर, शंकर गावडे, मेंगो गावडे, सुभाष सतरकर, तुळशीदास गावडे, बाबुली गावडे, नारायण गावडे, केशव गावडे, रोहिदास सतरकर, जांबुवत गावडे आदींचा यावेळी पाहुण्याच्याहस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जीवन हे क्षणभुंगुर आहे त्यासाठी काळाच्या गतीने भान ठेऊन कलेच्या माध्यमातून कलाकारांनी अमर व्हावे जेणेकरून समाज कलाक्षेत्रातील कार्यकर्त्याचे सदैव स्मरण ठेवील असे यावेळी बोलताना डॉ. दिपाली नाईक म्हणाल्या. भालचंद्र गावडे यांनी लिहिलेल्या ‘विश्वसखा हा कृष्ण जन्मला’ या नाटकाचे प्रकाशन श्री नावती यांच्याहस्ते करण्यात आले. भालचंद्र गावडे यानी सुत्रसंचालन केले तर वामन सतरकर यांनी आभार मानले.









