जगभरातील हिंदू समाजाच्या दृष्टीने गाय अत्यंत पवित्र आहे. भारतात ‘गोमूत्रा’लाही मोठे महत्व दिले जाते. श्रावणीच्या दिवशी पंचगव्य प्राशन करण्याची प्रथा अनेक लोक पाळतात. पंचगव्यात गोमूत्र असतेच. पण केवळ भारतातच गाईचे इतके महत्व आहे, असे समजण्याचे कारण नाही. या पृथ्वीच्या पाठीवर असा आणखी एक देश आहे, की जेथील एक प्राचीन समुदाय गोमूत्राला पवित्र मानतो. त्याचा उपयोग करतो आणि त्याचे प्राशनही करतो. या देशाचे नाव दक्षिण सुदान असे असून तेथे पूर्वापारपासून स्थायिक असणारा ‘मुंडारी’ नामक समाज गोमूत्राला अतिशय पवित्र मानतो. हा समाजही हिंदू असेल, असे आपल्याला वाटेल. पण तसे नाही. हा समाज हिंदू नसूनही गोमूत्राला हिंदू देतात तसेच महत्व देतो.
ज्या प्रमाणे हिंदू समाजात गोमूत्राचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व आहे, तसे या मुंडारी समाजातही आहे. या समाजाच्या कोणत्याही शुभ कार्यक्रमात गोमूत्र प्राशनाची पद्धत आहे. तसेच या समाजाचे अनेक लोक सकाळी उठल्यानंतर गोमूत्राने तोंड आणि चेहरा धुतात. ही या समाजाची पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. इतकेच नव्हे, तर गोमूत्राचा उपयोग पारंपरिक पद्धतीची सौंदर्य प्रसाधने बनविण्यासाठीही केला जातो. गोमूत्र हे प्रकृतीस्वास्थ्यासाठी उत्तम असते असे हा समाज मानतो. हा समाज गाईनांही हिंदू ज्या प्रमाणे पवित्र मानतात, त्याचप्रमाणे त्यांना पवित्र मानतो. या समाजाच्या धार्मिक आणि आध्यत्मिक जीवनात गाय आणि गोमूत्र यांना असलेले महत्व पाहून अनेकजण आश्चर्यचकित होतात. भारतातीलच ‘गो संस्कृती’ या समाजात पोहचली आहे का, असा प्रश्नही विचारला जातो. मुंडारी समाजात गोवंश आणि गोमूत्राला पवित्र मानण्याची ही प्रथा केव्हापासून आणि कोणत्या कारणास्तव आहे, तसेच या परंपरेचा मूळ स्रोत कोणता आहे, यावर काही लोकांनी अलिकडच्या काळात संशोधनाला प्रारंभ केला आहे.









