भारतीय कौटुंबिक पद्धतीमध्ये, प्रभावी संवाद हा हृदय, मने आणि पिढ्यांना जोडणारा धागा आहे. भारतीय कुटुंबे त्यांच्या अतूट नातेसंबंधांसाठी आणि मजबूत बंधांसाठी ओळखली जातात. भारतीय संस्कृती कुटुंब आणि समाजाशी चांगले संबंध राखण्यावर खूप महत्त्व देते. एक समुदाय म्हणून आपण खूप लोकाभिमुख आहोत आणि आपण भारतीय आपल्या प्रियजनांसाठी काहीही करू शकतो. जगात जिकडे कुटुंबे विभक्त होत आहेत, लोक स्वार्थीपणामुळे आपल्याच जवळच्या माणसांना लांब करत आहेत तिथे आपण भारतीय अजूनही संयुक्त कुटुंब पद्धत पाळतो. पण, इतके सगळे असतानाही भारतीय कुटुंबे संघर्ष आणि गैरसमजापासून मुक्त नाहीत. पण, भांड्याला भांडं लागलं की आवाज करतातच. तसेच, वेगवेगळ्या स्वभावाची आणि विचारांची माणसे एकत्र आली की मतभेद होणारच. पण, सुधारित संवाद कौशल्यांद्वारे, भारतीय कुटुंबे मतभेद आणि वाद विवाद कमी करू शकतात आणि कुटुंबातील सदस्यांमधील सामंजस्यता वाढवू शकतात आणि नातेसंबंध अधिक मजबूत करू शकतात. उपाय शोधण्याआधी, भारतीय कुटुंबांमधील निरोगी कौटुंबिक नातेसंबंधांना बाधा आणणाऱ्या काही समस्याप्रधान कारणे ओळखणे आवश्यक आहे.
मूक दडपशाही
काही भारतीय कुटुंबांमध्ये, संवेदनशील समस्या सोडवण्याच्या बाबतीत मौन बाळगण्याची संस्कृती अस्तित्वात आहे. अनेकदा, आनंदी वातावरण टिकवून ठेवण्यासाठी घरातील वडीलधारी व्यक्ती संघर्ष आणि अप्रिय अनुभवांवर चर्चा करण्याचे टाळतात. शांतता राखण्याचा हा एक मार्ग वाटत असला तरी, यामुळे निराशा आणि निराकरण न होणाऱ्या समस्या उद्भवू शकतात.
श्रेणीबद्ध संवाद
भारतातील पारंपरिक कौटुंबिक पदानुक्रम काहीवेळा मुक्त आणि प्रामाणिक संवादात अडथळा आणतात. कुटुंबातील तऊण सदस्यांना त्यांची मते किंवा चिंता व्यक्त करण्यास संकोच वाटू शकतो, विशेषत: मोठ्यांच्या उपस्थितीत. कुटुंबातील वडिलधाऱ्यांना नेहमी त्यांच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम हवे असते. पण आपल्या प्रियजनांना मदत करण्यास सक्षम होण्यासाठी, प्रत्येकाने कुटुंबात एक सुरक्षित वातावरण तयार करणे आवश्यक आहे, जिथे मुलांना त्यांच्या भावना आपल्याशी व्यक्त करण्यास सोयीस्कर वाटेल.
सक्रिय ऐकण्याची कमतरता
प्रभावी संवादासाठी फक्त बोलणेच नाही तर सक्रिय ऐकणेदेखील समाविष्ट आहे. काही कुटुंबांमध्ये, समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन खऱ्या अर्थाने समजून घेण्याऐवजी केवळ प्रतिसाद देण्यासाठी ऐकण्याची प्रवृत्ती असू शकते. यामुळे गैरसंवाद आणि गैरसमज होऊ शकतात.
प्रभावी संवाद हा भारतीय कुटुंबातील निरोगी कौटुंबिक संबंधांचा आधारस्तंभ आहे. प्रत्येक गोष्ट एकाच गोष्टीवर येऊन थांबते आणि ती म्हणजे प्रेम. एकमेकांबद्दल मनापासून प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी असली, की या सर्व गोष्टी सहजपणे पार पडू शकतात. भारतीय कुटुंब व्यवस्था अतिशय अनोखी आणि लोकाभिमुख आहे. त्यामुळे समाज व कुटुंबाचे कल्याण राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जुन्या-नव्या पद्धतींमधले चांगले गुण ओळखून, त्यांना समाजाला व माणसाला एकत्रित जाण्यासाठी प्रयास केला पाहिजे. कुटुंब प्रेम हा जगातला सर्वात मोठा आशीर्वाद आहे आणि या आशीवार्दाला जपण्याची सर्वात महत्त्वाची गुऊकिल्ली म्हणजे प्रेम आणि प्रेमाने केलेला संवाद आहे !
संवादातील पिढीतील अंतर
प्रत्येक पिढी वेगळी आहे व त्याची आपापली कौशल्ये आहेत. एखादी पिढी दुसऱ्या पिढीपेक्षा वेगळी असली तरी ती पूर्णत: बरोबर किंवा चूक होऊ शकत नाही. भारतातील तऊण पिढी सहसा अधिक थेट व ठाम संवाद शैली अवलंबते, जी जुन्या पिढीच्या अधिक पारंपरिक व अप्रत्यक्ष दृष्टिकोनाशी टक्कर देऊ शकते. समोरच्याला मदत करण्यासाठी किंवा नातेसंबंध टिकवण्यासाठी आपल्यातले व समोरच्या माणसांमधले फरक स्वीकारून आपुलकी व जिव्हाळ्याने एक दुसऱ्याशी संवाद साधला पाहिजे.
या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन, समजून, त्यावर थोडे काम केले तर अधिक प्रभावी संवाद स्थापित केला जाऊ शकतो ज्यामुळे नातेसंबंध अजून मजबूत होऊ शकतात.
- मोकळे आणि सुरक्षित वातावरण: कुटुंबात असे वातावरण तयार केले गेले पाहिजे जिथे प्रत्येक सदस्याला सुरक्षित वाटेल आणि त्यांचे विचार आणि भावना व्यक्त करण्यास प्रोत्साहन मिळू शकेल. या गोष्टीची खात्री घेणे गरजेचे आहे की संभाषणे निर्णय व टीकेपासून मुक्त आहेत, विशेषत: संवेदनशील विषयांवर चर्चा करताना.
- आदरयुक्त भीती : आदरयुक्त संवादाच्या महत्त्वावर जोर देणे आवश्यक आहे. मतभेद होत असतानाही कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांच्या मतांचा व भावनांचा आदर राखला पाहिजे.आक्रमकतेपेक्षा खंबीरपणा हवा.
- दोष आणि आरोप टाळा: दोष देण्याऐवजी किंवा आरोप करण्याऐवजी, मीपणा टाळला पाहिजे. उदाहरणार्थ, ‘माझं म्हणणं ऐकलं पाहिजे’ या ऐवजी, ‘आपण मिळून या परिस्थितीवर तोडगा कसा काढू शकतो?’ यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
- नियमित कौटुंबिक बैठका : वरचेवर कौटुंबिक सभा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ देऊ शकतात. कुटुंबातील सर्व सदस्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा आणि त्यांचे दृष्टिकोन सर्वसमावेशक करा.
5. अभिव्यक्तीला प्रोत्साहन द्या: कुटुंबातील सदस्यांना, विशेषत: मुलांना मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहित करा. त्यांच्या भावनांची पडताळणी करा आणि त्यांच्या गरजा आणि चिंता व्यक्त करण्यासाठी त्यांना योग्य मार्ग शोधण्यात मदत करा.
- कौटुंबिक क्रियाकलाप: ((Family activity) कौटुंबिक क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहण्याचा प्रयास केला पाहिजे जे नातेसंबंध वाढवतात. एकत्र अनुभव व्यक्त केल्याने कुटुंबातील सदस्यांमधील संवाद आणि संपर्क मजबूत होऊ शकतो.
7. व्यावसायिक समुपदेशकाची मदत घ्या: सतत संवादाची आव्हाने किंवा खोलवर ऊजलेल्या संघर्षांच्याबाबतीत, ‘पॅमिली थेरपिस्ट’ किंवा समुपदेशकाची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. ते कुटुंबातील संवाद सुधारण्यासाठी मार्गदर्शन आणि साधने देऊ शकतात.
- आत्मचिंतनाची वेळ: कुटुंबातील सदस्यांना आत्मचिंतनात गुंतण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. हे आपल्याला आपल्या स्वत:च्या संवाद पद्धतींबद्दल व ते संघर्षांमध्ये कसे योगदान देऊ शकतात याबद्दल अधिक जागरूक होण्यास मदत करू शकतात.
- मतभेदातील विविधता स्वीकार करा: कुटुंबातील मते आणि दृष्टिकोनांची विविधता स्वीकारा. वेगवेगळ्या कुटुंबातील सदस्य कुटुंबामध्ये अद्वितीय गुण व दृष्टिकोन आणतात हे सत्य स्वीकार करा.
-श्राव्या माधव कुलकर्णी








