वीजग्राहकांमध्ये समाधान : अतिरिक्त वीज वापराचे बिल मात्र भरावे लागणार
बेळगाव : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच हेस्कॉमकडून विद्युत ग्राहकांना शून्य रुपयांचे बिल दिले जात आहे. दर महिन्यात येणारे विद्युतबिल या महिन्यात शून्य आल्याने ग्राहकही सुखावत आहेत. हेस्कॉमने या महिन्याचे रिडींग घेऊन विद्युतबिल देण्यास सुरुवात केली असल्याने टप्प्याटप्प्याने शहराच्या इतर भागातही शून्य रुपयांची बिले दिली जाणार आहेत. हेस्कॉमकडून प्रत्येक महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत घरोघरी जाऊन मीटरचे रिडींग घेतले जाते. रिडींगनुसार ग्राहकांना बिल दिले जाते. सध्याच्या सरकारने सुरू केलेल्या गृहज्योती योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे. जुलै 27 पर्यंत ज्या ग्राहकांनी गृहज्योती योजनेसाठी सरकारकडे नोंदणी केली आहे, अशा ग्राहकांना ऑगस्टचे विद्युतबिल शून्य रुपये दिले जात आहे. राज्य सरकारकडून 18 जूनपासून गृहज्योती योजनेच्या नावनोंदणीसाठी सुरुवात करण्यात आली होती. ग्राहकांना आपला ग्राहक क्रमांक व मोबाईल क्रमांक दिल्यानंतर नोंदणी करून घेतली जात होती. गृहज्योती योजनेच्या नोंदणीसाठी अंतिम तारीख नाही. केव्हाही या योजनेसाठी नोंदणी करता येऊ शकते. ऑगस्ट महिन्यात जे ग्राहक नोंदणी करतील त्यांना सप्टेंबर महिन्यात योजनेचा लाभ मिळेल. ग्राहकांच्या मागील वर्षभराच्या विद्युतबिलाची सरासरी काढून त्यामध्ये 10 टक्के सरकारकडून भर घातली जाणार आहे.
ऑगस्टच्या पहिल्या तारखेपासून शून्य रुपये बिल
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेपासून मीटर रिडींगच्या कामाला सुरुवात होते. ऑगस्टच्या पहिल्या तारखेपासून ग्राहकांना गृहज्योती योजनेंतर्गत शून्य रुपये विद्युतबिल दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
– ए. एम. शिंदे (साहाय्यक कार्यकारी अभियंते, हेस्कॉम)









