शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांची माहिती
पर्वरी : गोव्यातील सर्व पूर्व प्राथमिक, बालवाडी, अंगणवाडींमध्ये येत्या 3 जुलैपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची पायाभूत टप्प्यावर (फाऊंडेशनल स्टेज) अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पुढे टप्याटप्याने माध्यमिक टप्प्यापर्यंत अभ्यासक्रम लागू करुन 2026 पर्यंत पूर्णपणे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चालीस लावण्यात येईल, अशी माहिती शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. शंभू घाडी उपस्थित होते. नव्या शैक्षणिक धोरणानुसार पायाभूत टप्प्यावर शाळा प्रवेशाचे वय 3 वर्षे केले आहे. या पायाभूत टप्प्याच्या कालावधीत मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे. या टप्प्याकरीता ठराविक अभ्यासक्रम नसला तरीही आराखड्याच्या तरतुदीनुसार लवचिक, बहुमुखी, बहुस्तरीय, क्रीडा आधारित, कृती आधारित आणि चौकस वृत्तीस चालना देणाऱ्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात येणार आहे. ती माहिती हँडबुक स्वरूपात शिक्षकांसाठी उपलब्ध असणार आहे.
मास्टर ट्रेनर प्रशिक्षण
सध्या जे शिक्षक पूर्व प्राथमिक, बालवाडी, अंगणवाडी शाळांमध्ये शिकवितात त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अन्य राज्यातून तज्ञ शिक्षक आणून ‘मास्टर ट्रेनर’ प्रशिक्षण सुरू आहे. यात शंभर शिक्षक प्रशिक्षण घेत आहेत. नंतर हे शिक्षक आपापल्या तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत.
या टप्प्यात तीन हजार शाळा
या पायाभूत टप्प्यात गोव्यात जवळजवळ तीन हजार पूर्व प्राथमिक, बालवाडी, अंगणवाडी शाळा आहेत. पूर्वी त्या शाळा शिक्षण खात्याजवळ नोंदणी करणे सक्तीचे नव्हते, पण आता या सर्व खाजगी पूर्व प्राथमिक शाळा शिक्षण खात्याकडे नोंदणी करणे सक्तीचे आहे. सरकारी बालवाडी, अंगणवाडी, पूर्व प्राथमिक यांना ही सक्ती लागू नाही.
अनिल सामंत समिती कार्यरत
शिक्षणतज्ञ अनिल सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीकडून राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर राज्याचा अभ्यासक्रम आराखडा तयार होणार आहे.
मुलांची परीक्षा नाही, पण…
या पहिल्या स्तरावर मुलांची परीक्षा घेतली जाणार नाही. पण या टप्प्यात त्या मुलामध्ये अपेक्षित कौशल्य विकसित झाले आहेत की नाही याची नोंद करण्यात येईल, अशीही माहिती लोलयेकर यांनी दिली.









