वकिलांनी घेतली मुख्यमंत्री-कायदामंत्र्यांची भेट
बेळगाव : वकिलांना मारहाण करणे, वकिलांचा खून करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे वकील असुरक्षित झाले आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी कोणताच कायदा अंमलात आणला गेला नाही. त्यामुळे असे प्रकार घडत आहेत. तेव्हा तातडीने वकील संरक्षण कायदा अंमलात आणावा, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि कायदा मंत्री एच. के. पाटील यांच्याकडे केली आहे. सोमवारी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कायदा मंत्री एच. के. पाटील यांची भेट घेतली. त्यांना याबाबत निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्री व कायदा मंत्र्यांनी याबाबत सभागृहामध्ये हा प्रश्न मांडून त्यावर अंमलबाजवणी करू, असे आश्वासन दिले. यावेळी कायदा मंत्र्यांना घडलेल्या घटनांसंदर्भातील माहिती बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. सचिन शिवण्णावर, जनरल सेक्रेटरी अॅड. गिरीराज पाटील यांनी दिली. गेल्या काही महिन्यांमध्ये तर अधिक घटना घडल्या आहेत. गुलबर्गा येथे वकिलाचा खून करण्यात आला तर चिक्कमंगळूर येथे पोलिसांनी वकिलाला मारहाण केली. या घटना अत्यंत गंभीर आहेत. तेव्हा वकिलांसाठी संरक्षण कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे सदस्य महांतेश पाटील, माजी उपाध्यक्ष आर. सी. पाटील यांच्यासह इतर वकील उपस्थित होते.









