कोल्हापूर :
कागल तालुक्यातील सावर्डे बु. येथील जल जीवन मिशन योजने अंतर्गत सुरु असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प राबवा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. आवश्यकता असल्यास सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आमदार निधीतून पैसे देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कागल तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी कागल तालुक्यातील सावर्डे बु. येथील जल जीवन मिशन योजनेंर्गत सुरु असलेल्या नळ पाणीपुरवठा योजने संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी जल जीवन मिशन मधील योजनेचा सुधारित आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंत्यांनी दिली. गावातील उपस्थित सदस्यांनी काम सुरू करण्यासाठी मागणी केली. या योजनेत दोन वेळा पाणी लिफ्ट करावे लागणार आहे, पाणी शुद्धीकरण प्रकल्पही आहे तसेच यासाठी तिन्ही ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात यावा अशा सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. सुधारित प्रस्ताव एमजेपीकडे पाठवण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सांगितले.
मुरगूड, ता. कागल हद्दीतील माधवनगर मधील 25 प्लॉट (बेघर) धारकांचे नाव लावून पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देणे याबाबत बैठक झाली. अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी मोजणी करून त्याठिकाणी लेआउट करावा. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा समितीसमोर सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. मुरगूड शहरातील पाटील कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, सावर्डेकर कॉलनी, कापशी रोड, देशमुख कॉलनी, भोसले कॉलनी व इतर कॉलनीतील घरांना शेतसारा व नगरपरिषदेचा घरफाळा असे दोन कर लागू असून त्यातील शेतसारा कमी करणे यासाठी मागणी करण्यात आली. याबाबत जिल्हा नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना मुख्याधिकारी समवेत पाहणी करून आठ दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश दिले. यावेळी शेंडा पार्क येथील 1100 बेड रुग्णालय डी.पी. प्लॅन मधील जाणारा नवीन रस्ता विकसित करणे बाबत बैठकीत चर्चा झाली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले आदी, उपस्थित होते.
- कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा
मुरगुड पालिकेच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असतो. तसेच तो जाळला जातो. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडून कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी झिरो कचरा व्यवस्थापन करण्याच्या सूचना संबंधित मुख्याधिक्रायांना दिल्या. तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना भेट देऊन पाहणी करण्याच्या सूचना केल्या.








