पत्रकार परिषदेत ए. पी. एम. शन्मुखया यांची मागणी
बेळगाव : 1 जुलै 2022 ते 31 जुलै 2024 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू झाले नाही. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. या 25 महिन्याच्या कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन मिळावे, अशी मागणी कर्नाटक निवृत्त नोकर संघाचे राज्य महाप्रधान संचालक ए. पी. एम. शन्मुखया यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली. सातव्या वेतन आयोगानुसार 1 जुलै 2022 ते 31 जुलै 2024 दरम्यान निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन मिळणे आवश्यक आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. राज्यातील 26643 सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी या सुधारित वेतनापासून वंचित राहिले आहेत. याबाबत सप्टेंबर महिन्यात बेंगळूर येथे आंदोलन छेडून आवाज उठविण्यात आला होता. मात्र अद्यापही या सुधारित वेतनाची अंमलबजावणी झालेली नाही.
विधानसौधवर मोर्चा काढण्याचा निर्णय
या मागणीसाठी आता विधानसौधवर मोर्चा काढण्याचा निर्णयही कर्नाटक निवृत्त नोकर संघाने घेतला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी अशोक सज्जन, एस. जी. रोट्टी, एम. व्ही. हिरेमठ, एस. जी. सिदनाळ, शंकर सुंटक्की, अर्जुन सुंटक्की उपस्थित होते.









