जिल्हाधिकारी कार्यालयात विकास आढावा बैठक : विकासकामे राबविताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्राधान्य देण्याच्या सूचना
बेळगाव ; बेळगाव जिल्ह्यातील सुरू असणाऱ्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विकास आढावा बैठक पार पडली. रेल्वे, पाटबंधारे, महामार्ग, रिंगरोड, फ्लायओव्हर उभारणी, भूसंपादन व पुनर्वसन यासंदर्भात योजनांची वेगाने अंमलबजावणी करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केल्या. विकासकामे राबविताना काही तांत्रिक अडचणी येत असून त्या दूर करण्यासाठी प्राधान्याने त्याकडे लक्ष पुरविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जिल्ह्यात सुरू असणाऱ्या विविध विकासकामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला.
रिंगरोडसंदर्भात सविस्तर चर्चा
बेळगाव शहराच्या सभोवताली रिंगरोड करण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात विकास आढावा बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. कडोली, होनगा, बेन्नाळी, अलतगा यासह लहान गावांमधील शेकडो एकर जमीन रिंगरोडसाठी संपादित केली जाणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांचा अभिप्राय लक्षात घेऊन आराखड्यामध्ये काही प्रमाणात बदल करावा. तसेच जवळच्या एक-दोन कि.मी. अंतरावर पर्यायी जागा शोधावी, अशा सूचना महामार्ग व भूसंपादन विभाग अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या उर्वरित कामाला लवकरच सुरुवात करावी. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून रस्ता करण्यास सुरुवात करण्याची सूचना केली. पहिले व दुसरे रेल्वेगेट येथे फ्लायओव्हर उभारणीसाठी निविदा काढून त्या कामाला सुरुवात करावी. मनपा, सार्वजनिक बांधकाम खाते व पोलीस प्रशासनाने चर्चा करून आराखडा तयार करावा. रेल्वे प्रशासनाकडून तयार करण्यात आलेले अंडरपास ब्रिज अवैज्ञानिक पद्धतीने तयार करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पुढील अंडरपास ब्रिज तयार करताना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच ब्रिज तयार करण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बहुमजली इमारत
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अनेक सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे त्याठिकाणी बहुमजली इमारत बांधल्यास नागरिकांना आपली कामे करण्यासाठी सोयीचे होणार आहे. गांधीनगर ते किल्ला यादरम्यान फ्लायओव्हर तयार करण्याचा विचार असून यासंदर्भात अधिकाऱ्यांनी आराखडा तयार करावा. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याने फ्लायओव्हर महत्त्वाचा ठरणार आहे. या फ्लायओव्हरचा विस्तार पिरनवाडीपर्यंत होण्याची शक्यता असल्याने त्यासंदर्भात पाहणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या. रेल्वे मंत्रालयाकडून भूसंपादनाची प्रक्रिया राबविताना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या अडचणी लवकरात लवकर दूर करण्याच्या सूचना रेल्वे तसेच महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. कबलापूर गावचे स्थलांतर 72 एकर जागेत करण्यात येणार आहे. परंतु येथील ग्रामस्थांनी गावालगत स्थलांतर करण्याची मागणी केली असल्याने ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ म्हणाले, तहसीलदार कार्यालय कमकुवत होत असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणाऱ्या बहुमजली इमारतीत तहसीलदार कार्यालयाला प्राधान्य द्यावे. पूरग्रस्त गावांची नावे घोषित करून त्यांच्या स्थलांतराची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. रिंगरोडमुळे वाहतूक कोंडी कमी होणार असून यासंदर्भातील कामाला गती आणावी, पिरनवाडी येथे उ•ाणपूल बांधण्यासंदर्भात आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. अथणी, कागवाड, चिकोडी येथे बायपास रोड बनविणे आवश्यक असून रिंगरोड तयार केल्यास वाहतुकीच्या समस्या सोडविणे सोयीचे होईल, अशा सूचना जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी मांडल्या. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर याचबरोबर रेल्वे, मनपा, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, राष्ट्रीय महामार्ग, भूसंपादन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
खोटी माहिती पसरविणाऱ्यांवर कारवाई करा…
सोशल मीडियामधून खोट्या व चुकीच्या बातम्या व्हायरल केल्या जात आहेत. अशी खोटी माहिती पसरविणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई करावी. तसेच सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष तयार करण्याच्या सूचना जिल्हा पोलीसप्रमुख व पोलीस आयुक्तांना पालकमंत्र्यांनी केल्या. बेळगाव हे व्यापारी केंद्र असून याठिकाणी असणारे मॉल, मोठी आस्थापने, सोन्या-चांदीची दुकाने यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा राबवावी. महामार्गाशेजारी असणाऱ्या दुकानांना सीसीटीव्ही सक्तीचे करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.









