पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी विकास आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या सूचना
बेळगाव : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणाऱ्या गावांची वेळीच दखल घेऊन उपाययोजना हाती घ्या. उन्हाळा तीव्र असल्याने पाण्याची गरज ओळखून त्यानुसार पाणीपुरवठ्याची व्यवस्था चोखपणे राबवा, अशी सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना केली. येथील सुवर्णविधानसौधमध्ये मंगळवारी झालेल्या 2024-25 मधील चौथ्या त्रैमासिक कर्नाटक विकास आढावा बैठकीमध्ये अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री सतीश जारकीहोळी बोलत होते. जलजीवन मिशन योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेली कामे लवकर पूर्ण करावीत. त्याचबरोबर इतर कामांसंबंधी सरकारला पाठविण्याचा अहवाल त्वरित सादर करावा, अशी सूचना केली.
जिल्ह्यासाठी मंजूर झालेले कॅन्सर हॉस्पिटल बिम्सच्या आवारात उभारण्याचा निर्णय झाला आहे. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी तज्ञ डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी सरकार प्राधान्य देत आहे. दिव्यांगांना तिचाकी वाहनांचे वितरण संबंधित आर्थिक वर्षातच करावे. अंगणवाडी केंद्रांना पुरविण्यात येणारी अंडी व इतर खाद्यपदार्थांचा दर्जा तपासण्यात यावा. यंदाचा दहावीचा निकाल समाधानकारक लागलेला नाही. यामध्ये सुधारणा होण्याच्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत. वन खात्याशी संबंधित होणाऱ्या बैठकांना अधिकाऱ्यांनी नियमितपणे हजर राहावे, अशा सूचनाही केल्या.
दिव्यांग आणि वयोवृद्धांच्या मागण्या, समस्यांची वेळीच दखल घेण्यात यावी, अशी मागणी आमदार आसिफ सेठ यांनी केली. बैठकीमध्ये बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे, चिकेड़ीचे आमदार गणेश हुक्केरी आदींनी आपल्या भागातील समस्या मांडल्या. रायबागमध्ये सरकारी मालमत्तेवरील न्यायप्रविष्ट प्रकरणाशी संबंधित स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे म्हणाले, शाळांना डेस्क उपलब्ध करून देण्याच्या मागणीची दखल घेण्यात आली असून डेस्क लवकरच पुरविण्यात येतील.
बैठकीनंतर दहावी परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या बैलहेंगलच्या ऊपा पाटील हिच्यासह विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गैरविण्यात आले. तसेच माहिती खात्याने तयार केलेल्या पंचहमी योजनांची यशेगाथा पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना न्याय मिळालेला नाही. भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी करारामुळे तुर्तास युद्धजन्य वातावरण निवळले आहे. पुढे काय केले पाहिजे, यावर विचार झाला पाहिजे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याबद्दल आक्षेप घेण्यात येत असल्याच्या विचारावर मंत्री जारकीहोळी म्हणाले की, तो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा विचार आहे. ट्रम्प यांनी मध्यस्थी का केली? त्यांना कोण विनंती केली होती हे एकदा बाहेर प़ड़ेलच.
सुमोटो केस दाखल करून तपास
संतिबस्तवाड येथील प्रार्थनास्थळात ठेवलेल्या धर्मग्रंथाला आग लावल्याचा प्रकाराचा पोलिसांनी सुमोटो केस दाखल करून तपास चालविला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. सुवर्णसौध येथे मंगळवारी पत्रकारांसमोर ते बोलत होते.









