बीसीसीआयचा ‘आयपीएल’च्या धर्तीवर निर्णय, आशियाई खेळांत पुरुष, महिला संघांच्या सहभागास मान्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘आयपीएल’मध्ये वापरण्यात आलेला बहुचर्चित ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम यंदा 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी20 चषक स्पर्धेमध्ये वापरला जाईल. याला बीसीसीआयच्या सर्वोच्च मंडळाने मंजुरी दिली आहे. गेल्या हंगामातही सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम सादर करण्यात आला होता. परंतु तो 14 व्या षटकाच्या समाप्तीपूर्वी आणणे आणि नाणेफेकीच्या आधी त्याचे नाव देणे बंधनकारक बनविण्यात आले होते.
मात्र येत्या हंगामापासून यात बदल होईल. आयपीएलप्रमाणे संघांना नाणेफेकपूर्वी खेळणाऱ्या 11 खेळाडूंच्या व्यतिरिक्त चार बदली खेळाडूंची नावे देण्याची परवानगी असेल. या चारपैकी फक्त एक ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून वापरला जाऊ शकेल. संघांना प्रत्येक सामन्यात एक ‘इम्पॅक्ट प्लेयर’ वापरण्याची परवानगी असेल. तथापि ते अनिवार्य नाही, असे मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे. ‘आयपीएल’च्या 10 संघांद्वारे ‘इम्पॅक्ट प्लेयर’चा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला होता. परंतु या तरतुदीबाबत मतभिन्नता दिसून आलेली आहे. माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग याने यामुळे संघातील अष्टपैलूची भूमिका जवळजवळ संपुष्टात आली असल्याचे मत व्यक्त केले होते.
दरम्यान, आशियाई खेळांच्या सहभागास मान्यता बीसीसीआयने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हांगझाऊ येथे होणाऱ्या आशियाई खेळांतील पुरुष आणि महिला संघांच्या सहभागासही मान्यता दिली आहे. 28 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पुरुषांच्या स्पर्धेत भारताचा द्वितीय संघ सहभागी होईल, तर 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या महिलांच्या स्पर्धेसाठी पूर्ण ताकदीचा संघ निवडला जाईल. आशियाई खेळांच्या इतिहासात क्रिकेटची स्पर्धा फक्त तीनदाच खेळली गेली आहे. मागील खेपेला म्हणजे 2014 मध्ये इंचॉन येथे झालेल्या आशियाई खेळांत क्रिकेटचा समावेश होता, पण तेव्हा भारत सहभागी झाला नव्हता.
5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा सुरू होत असल्याने पुरुष संघाच्या बाबतीत असा निर्णय घेणे भाग पडले आहे. एका निवेदनात बीसीसीआयने म्हटले आहे की, व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रक लक्षात घेता आशियाई खेळांत संघ उतरविणे हे एक आव्हान आहे. परंतु राष्ट्रासाठी योगदान देणे देखील महत्त्वाचे आहे. क्रिकेटमध्ये पुऊष आणि महिला या दोन्ही गटांत सुवर्णपदके जिंकण्याची भारताला संधी असेल.









