बसेसची कमतरता, ग्रामीण फेऱ्या वाढवल्या, खासगी बसेसची चंगळ
बेळगाव : बेंगळूर, म्हैसूर या लांबपल्ल्याच्या बसफेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांना खासगी बससेवेवर अवलंबून रहावे लागत आहे. लांब पल्ल्याच्या बसेस जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी वापरल्या जात आहेत. त्यामुळे लांब पल्ल्यासाठी बसेसची कमतरता जाणवू लागली आहे. या संधीचा फायदा आता खासगी बसेस घेऊ लागल्या आहेत. शक्ती योजनेमुळे प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही बसेसची कमतरता जाणवत आहे. या मार्गावर आता लांब पल्ल्याच्या बसेस सोडल्या जात आहेत. त्यामुळे बेंगळूर, म्हैसूर, बळ्ळारी येथे बसेसचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे शक्ती योजनेचा परिणाम लांब पल्ल्याच्या बससेवेवरही होताना दिसत आहे. बेळगाव, बैलहोंगल, चिकोडी, निपाणी येथील आगारातून धावणाऱ्या बसेस बंद झाल्या आहेत. बैलहोंगल येथून बेंगळूर, संभाजीनगर, सांगली आणि पणजीला धावणाऱ्या सहा बसफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर खासगी बसेसची चंगळ होऊ लागली आहे. त्यामुळे खासगी बसेसनी तिकीट दरातही वाढ केली आहे.
28 बसफेऱ्या कमी
बेळगाव विभागातील बैलहोंगल 6, खानापूर 7 आणि बेळगाव आगारातील 15 अशा एकूण 28 बसफेऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. त्याबरोबर चिकोडी, रायबाग आगारातून धावणाऱ्याही लांब पल्ल्याच्या बसेस कमी झाल्या आहेत. बेळगाव विभागातून आंतरराज्य मार्गावर दररोज 71 फेऱ्यातून 12,821 किलोमीटरचा प्रवास होत होता. तो आता 207 फेऱ्यातून 9,955 किलोमीटर झाला आहे. जिल्ह्यात बसेसचा तुटवडा निर्माण झाल्याने म्हैसूर, बेंगळूर आणि इतर ठिकाणी बसफेऱ्या कमी झाल्या आहेत. परिवहनच्या ताफ्यात नवीन बसेसची भर पडल्यानंतरच लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर होणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक बसफेऱ्या उपलब्ध
प्रवाशांच्या कमतरतेमुळे काही मार्गांवरील बससेवा बंद करून प्रतिसाद असलेल्या मार्गांवर सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रवासी आणि विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक बसफेऱ्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
– राजेंद्र हुद्दार,(विभागीय नियंत्रणाधिकारी)









