मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट : व्यापारी विक्रेत्यांना फटका : औद्योगिक वसाहतही शांत
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव बंदच्या हाकेचा बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. रविवारपेठ, गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार येथील बहुतांश दुकाने बंद राहिल्याने उलाढालीवर परिणाम झाला. दररोज गजबजणाऱ्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. किरकोळ दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद होती. त्यामुळे वर्दळदेखील थंडावलेली पहायला मिळाली.
वाढीव वीजबिलाविरोधात गुरुवारी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज याचबरोबर विविध औद्योगिक व्यापारी संघटनांनी बंदची हाक दिली होती. त्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झाला. विविध ठिकाणांहून शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्या रोडावली होती. किराणा, भाजीपाला, कपडे, भांडी, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, स्टेशनरी, मेडिकल आदी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे खरेदीदार नागरिकांचीदेखील गैरसोय झाली. किरकोळ दुकानदार वगळता सर्वच व्यापाऱ्यांनी दिवसभर दुकाने बंद ठेवण्याला पसंती दिली. त्यामुळे व्यावसायिकांनाही फटका बसला. त्याचबरोबर बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या हमालवर्गालादेखील फटका सहन करावा लागला.
गणपत गल्ली, खडेबाजार, कडोलकर गल्ली, मेणसी गल्ली, पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, भेंडीबाजार, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, काकतीवेस रोड, आरटीओ, नरगुंदकर भावे चौक, रविवारपेठ, संयुक्त महाराष्ट्र चौक आदी ठिकाणी वर्दळ कमी असलेली पहायला मिळाली. बाजारपेठेत भाजीपाला, हार, फुले, फळे आणि इतर किरकोळ विक्रेतेदेखील दाखल झाले नव्हते. त्यामुळे खरेदीदारांची गोची झाली. किरकोळ साहित्यदेखील मिळाले नसल्याने नागरिकांना धडपड करावी लागली. विशेषत: दैनंदिन भाजीपाला, दूध आणि इतर साहित्यासाठीदेखील फिरावे लागले.
याबरोबरच उद्यमबाग, मच्छे, मजगाव, अनगोळ, नावगे, काकती, वाघवडे, होनगा, ऑटोनगर येथील उद्योजक आणि कर्मचारीदेखील मोर्चात सहभागी झाले होते. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत व्यावसायिक गाळेही बंद होते. त्यामुळे वसाहतीत शुकशुकाट पसरला होता. दररोज धडधड करणारी औद्योगिक वसाहत गुरुवारी शांत झालेली पाहायला मिळाली.
किरकोळ, बैठ्या व्यावसायिकांना फटका
शहरात बैठा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांची संख्या अधिक आहे. त्या मध्ये भाजीपाला, फळे, कपडे, हार, फुले आदींचा समावेश आहे. गुरुवारच्या बंदमुळे या किरकोळ व्यावसायिकांना फटका बसला. दैनंदिन व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांना व्यवसायावर पाणी सोडावे लागले. त्यामुळे किरकोळ बैठ्या विक्रेत्यांतून नाराजी व्यक्त झाली.

उद्यमबाग-मच्छे परिसरात उद्योजकांचा सहभाग
मच्छे : वाढीव वीजबिलविरोधात बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स आणि औद्योगिक व्यापारी संघटनांकडून बेळगाव बंदची हाक दिली होती. यात उद्यमबाग औद्योगिक वसाहत, मच्छे विभागातील उद्योजक कामगार, बेळगाव शहरातील लॉन्ड्री असोसिएशन, बेळगाव ट्रेडर्स, लघु व मध्यम व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोर्चात सहभाग दर्शविला. दररोज 24 तास घरघर चालणारी मशीन शॉप्स व फौंड्री यांचा आवाज गुरुवारी बंद झाला होता. उद्यमबाग व मच्छे परिसरात सर्व उद्योजकांनी व लहान मशीन शॉप यांनी बंद पुकारून कामबंद ठेवून मोर्चात सहभागी झाले होते. उद्यमबाग परिसरातील व मच्छे परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते.









