आमदार राजू सेठ : जिल्हा प्रशासनातर्फे जागतिक लोकसंख्या दिन
बेळगाव : देशाचा विकास होत असून लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजन प्रत्येक दाम्पत्याने अवलंबिले पाहिजे. लोकसंख्या वाढत असल्याने मानवी जीवनावर याचे अनेक दुष्परिणाम होत आहेत. लोकसंख्या वाढत असली तरी जमीन मात्र तितकीच आहे. यावर उपाययोजना राबविणे आवश्यक आहे, असे आमदार राजू सेठ यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते, बिम्स महाविद्यालय, जिल्हा आयुष्मान खाते, महिला आणि बालकल्याण खाते, वार्ता खाते, महानगरपालिका, नेहरू युवा केंद्र आणि विविध सेवा-संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते.
यावेळी कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. विश्वनाथ भोवी यांनी लोकसंख्या वाढीमुळे देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होत आहे. अन्न, पाणी, निवारा आदी गोष्टींच्या कमतरतेमुळे गरिबी, बेरोजगारी, सामाजिक असमानता वाढत आहे. प्रत्येक मिनिटाला 40 जणांचा जन्म होत आहे. मृत्यूचे प्रमाण घटले आहे. यासाठी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी मार्गदर्शन केले. यानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातून जनजागृती जत्था काढण्यात आला. यामध्ये स्काऊट अॅण्ड गाईड्स व विविध शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. बिम्स संचालक डॉ. अशोक शेट्टी, जिल्हा शस्त्रचिकित्सक डॉ. व्ही. व्ही. शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. इरण्णा पल्लेद आदी उपस्थित होते.









