अथणी, विजापुरातील बागायतदार आर्थिक संकटात
बेळगाव : फेंगल या चक्रीवादळामुळे तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटकच्या काही भागांसह दक्षिण भारतातील अनेक राज्यांना फटका बसला आहे. वादळामुळे केवळ पाऊसच नाही तर ढगाळ हवामानामुळे हाताशी आलेली पिके गमावून बसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अथणी, विजापूर भागात द्राक्षाचे मळे मोठ्या प्रमाणात आहेत. फेंगल वादळ व दमट आणि ढगाळ हवामानामुळे द्राक्षपिकावर रोग पडला आहे. परिणामी बागायतदारांना आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. राज्यात त्यातही प्रामुख्याने उत्तर कर्नाटकात फेंगल वादळाने धुमाकूळ घातला आहे. उत्तर कर्नाटकातील काही शहरात वादळ, पावसाचा जोर होता. हवामानाच्या परिणामामुळे तेथील पिकांवर परिणाम झाला. अथणी, विजापूर भागातील द्राक्षांवर ढगाळ हवामानामुळे किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. आता द्राक्षावर कीटकनाशकाची फवारणी करून पिकाचे जतन करणे व विक्रीसाठी बाजारात आणणे, अशी वेळ बागायतदारांवर आली आहे.
सबसिडीमध्ये कीटकनाशके उपलब्ध करून द्या
विजापूर, बागलकोट व बेळगाव जिल्ह्यात द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. विजापूरच्या 20 हजार हेक्टर शेतजमिनीमध्ये द्राक्षपीक घेण्यात येते. या पिकावर रोग पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. रोगाचा प्रादुर्भाव दूर करून द्राक्षपीक बाजारपेठेत आणणे शेतकऱ्यांना आव्हानात्मक ठरले आहे. दररोज प्रतिएकरी 5 ते 6 हजार रुपये खर्चातून द्राक्षपिकांवर कीटकनाशकाची फवारणी करावी लागत आहे. द्राक्षपिकाचे परीक्षेत्र किती मोठे असेल, तितका अधिक खर्च शेतकऱ्यांना कीटकनाशकासाठी करावा लागणार आहे. शेतकऱ्यांच्या या समस्येकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन सबसिडीमध्ये कीटकनाशके उपलब्ध करून द्यावीत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.









