अमेरिकेत कारवाई : दक्षिण कोरियाच्या अनेक नागरिकांना अटक
वृत्तसंस्था/ जॉर्जिया
अमेरिकेच्या जॉर्जिया येथील निर्माणाधीन हुंडई-एलजी प्रकल्पात इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी छापा टाकत 475 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रामुख्याने दक्षिण कोरियाच्या नागरिकांचा समावेश आहे. दक्षिण कोरियाचे हे नागरिक अवैध मार्गाने अमेरिकेत वास्तव्य करत होते असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हा प्रकल्प इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटऱ्यांचा पुरवठा करण्यासाठी स्थापन केला जात होता.
सोशल मीडियावर या छापेमारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असून यात होमलँड सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन्सचे अधिकारी तेथील कर्मचाऱ्यांना बससमोर हात ठेवून उभे राहण्याचा आदेश देताना दिसून येतात. या कर्मचाऱ्यांची झडती घेण्यात आली असून त्यांना बेड्याही ठोकण्यात आला.
कोरियाच्या कंपन्यांची गुंतवणूक
डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्यापासून अमेरिका आणि दक्षिण कोरियाचे संबंध बिघडत चालले आहेत. दोन्ही देशांदरम्यान 350 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूक विषयक क्यापार करारावरून मतभेद आहेत. ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे त्रस्त होत दक्षिण कोरियाने अमेरिकेच्या उत्पादनांवर आयातशुल्क लादले आहे. दक्षिण कोरियाच्या कंपन्यांनी अमेरिकेत अनेक प्रकल्प स्थापन केले आहेत. या प्रकल्पांमध्ये वाहने आणि इलेक्ट्रॉनिक सामग्रीची निर्मिती होते. अमेरिकेच्या आयातशुल्कापासून वाचण्यासाठी दक्षिण कोरियाच्या अनेक कंपन्यांनी अमेरिकेत प्रकल्प उभारण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
दावे-प्रतिदावे
छाप्यादरम्यान ज्या लोकांना अटक करण्यात आली, ते अमेरिकेत अवैध स्वरुपात वास्तव्य करत होते आणि बेकायदेशीर पद्धतीने काम करत होते असे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे सांगणे आहे, तर हे लोक दक्षिण कोरियासाठी लागू व्हिसा सूट कार्यक्रमाच्या अंतर्गत अमेरिकेत पोहोचले होते असा दावा संबंधित कर्मचाऱ्यांच्या वकिलाने केला आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत दक्षिण कोरियाच्या नागरिकांना व्हिसामुक्त 90 दिवसांचे अमेरिकेत वास्तव्य करण्याची अनुमती आहे.









