पाचव्या व सातव्या दिवशी फिरणार विसर्जन कुंड
बेळगाव : नदी, नाले, विहिरी यांचे प्रदूषण होवू नये यासाठी प्रदूषण महामंडळातर्फे गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या माध्यमातून फिरते विसर्जन कुंड सुरू केले. महापालिकेने दरवर्षी हे विसर्जन कुंड शहरातून फिरविले. यावर्षी पाचव्या व सातव्या दिवशी विसर्जन कुंड फिरणार आहे. शनिवार दि. 23 रोजी शहरातील विविध भागांतून हे कुंड फिरविण्यात येणार आहेत. त्या कुंडांमध्ये घरगुती गणेशमूर्ती विसर्जन करून सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी केले आहे. शनिवारी शहरामध्ये एकूण 10 ठिकाणी हे कुंड फिरणार आहेत. त्यामध्ये भाग्यनगर, पाचवा क्रॉस दुपारी 3 ते 4, पहिले रेल्वेगेट सायंकाळी 4.30 ते 5.30, जुना धारवाड रोड सायंकाळी 6 ते 7, खासबाग येथील बसवेश्वर चौक सायंकाळी 7.30 ते रात्री 8.30, सुभाष मार्केट, हिंदवाडी रात्री 9 ते 10, विश्वेश्वरय्यानगर बसथांबा दुपारी 3 ते 4, रामलिंगखिंड गल्ली टिळक चौक सायंकाळी 4.30 ते 5.30, स्टेट बँक ऑफ म्हैसूर महांतेशनगर सायंकाळी 6 ते 7, बॉक्साईट रोड सायंकाळी 7.30 ते रात्री 8.30, हनुमान सर्कल रात्री 9 ते 10 येथे कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. सातव्या दिवशीही अनेक जण गणेशमूर्ती विसर्जन करत असतात. त्यामुळे सोमवार दि. 25 रोजी दुपारी 3 ते रात्री 10 या वेळेत फिरते विसर्जन कुंड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भाग्यनगर पाचवा क्रॉस, पहिले रेल्वे गेट जवळ, जुना धारवाड रोड, खासबाग बसवेश्वर चौक, सुभाष मार्केट, हिंदवाडी, विश्वेश्वरय्यानगर बसथांबा, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक याचबरोबर कणबर्गी देवस्थान रोड, देवराज अर्स कॉलनी, हिंडलगा येथील झोपडपट्टी निर्मूलन कार्यालयाजवळ, सह्याद्रीनगर, नाझर कॅम्प वडगाव येथे विसर्जनासाठी कुंडाची व्यवस्था करण्यात येणार आहे.









