विविध भागातून आलेले पंजे-ताबूत मिरवणुकीने सायंकाळी किल्ला तलावात विसर्जन
बेळगाव : मोहरमनिमित्त मुस्लीम बांधवांच्यावतीने रविवारी शहरात पंजे आणि ताबूत मिरवणूक काढण्यात आली. शहरातील विविध भागातून आलेले पंजे आणि ताबूत या मिरवणुकीत सहभागी झाले. मोहरमच्या दहाव्या दिवशी दरबार गल्ली येथील शेरखान जामा मशीद परिसरात पंजे व ताबूतांची भेट झाली. त्यानंतर किल्ला तलावात पंजे व ताबूत विसर्जन करण्यात आले. मोहरम हा इस्लाम धर्मात आत्मचिंतनाचा दिवस मानला जातो. बेळगावातील मोहरमच्या मिरवणुकीत हिंदू आणि मुस्लीम बांधव एकत्र सहभागी होतात. शहरात वर्षानुवर्षे चालत आलेले एक अनोखे वैशिष्ट्या आहे. शहरातील गांधीनगर, आझादनगर, खंजर गल्ली, काकती वेस, कलईगार गल्ली, कांदा मार्केट आदी ठिकाणी स्थापन करण्यात आलेले पंजे व ताबूत यांची मिरवणूक रविवारी दहाव्या दिवशी काढण्यात आली. बेळगावातील ही परंपरा 100 वर्षांहून अधिक जुनी आहे, असे सांगितले जाते. सायंकाळी पंजे व ताबूचे किल्ला तलावात विसर्जन करण्यात आले. मोहरमच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकंदरीत बेळगावात मोहरम हा सन धार्मिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.









