गणपती विसर्जन मिरवणुकीला रात्री उशिरा प्रारंभ : गणेश भक्तांकडून ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर : फटाक्यांची आतषबाजी
बेळगाव : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत अनगोळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीला रात्री उशिरा सुरुवात झाली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लिलावाला रात्री उशिरा सुरुवात झाली त्यानंतर महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक रात्री दहा वाजता सुरू झाली. त्यामध्ये शिवशक्ती नगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती मंडपातून बाहेर पडली. त्यासोबत सार्वजनिक गणेशोत्सव आझाद चौक, एस व्ही रोड चिदंबरनगर येथील मंडळाची मूर्ती विसर्जनासाठी निघाली. यावेळी गल्लीतील नागरिक, महिला, बालगोपाळ व मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर गल्लीतील महिलांनी पाणी ओतून आरती करून फुलांचा वर्षाव केला व पूजन केले आणि गणरायाला निरोप दिला. तर मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळ गांधी स्मारक यांचा गणपती रात्री उशिरा विसर्जनासाठी निघाला. त्यानंतर गावातील मुख्य मंडळाचे गणपती विसर्जनासाठी बाहेर पडले.
बाल गणेशोत्सव मंडळ धर्मवीर संभाजी चौक, शिवनेरी युवक मंडळ रघुनाथ पेठ, मराठा चौक हे गणपती धर्मवीर संभाजी चौक येथे दाखल झाले. तर यानंतर श्रीराम युवक मंडळ राजहंस गल्ली अनगोळ यांचा गणपती गल्लीतून बाहेर पडला. यावेळी याठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई व भव्य मूर्ती पाहण्यासाठी गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी धर्मवीर संभाजी चौक येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. हे सर्व गणपती मुख्य रोडवरून मिरवणुकीमध्ये सामील झाले तर त्यांच्या पाठोपाठ सार्वजनिक गणेशोत्सव मारूती गल्ली, लोहार गल्ली, तसेच बॅ. नाथ पै नगर येथील गणपती धर्मवीर संभाजी चौक येथे दाखल झाले आणि विसर्जनासाठी निघाले. यावेळी या गणपतींना धर्मवीर संभाजी चौक येथे पोहचण्यासाठी पहाट झाली होती. यंदाही गावातील सर्व मंडळांचे श्रीफळ लिलाव रात्री उशिरापर्यंत सुरू होते आणि त्यानंतर आरती करून सजावट करून गणपती विसर्जनासाठी निघाले. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत अनगोळ मुख्य रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. त्यानंतर एक एक गणपती बाहेर आल्यावर रस्त्यावर गणेश भक्तांची गर्दी पहावयास मिळाली. यावेळी टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने मिरवणुकीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम पुजेरी व त्यांचे सहकारी संपूर्ण मिरवणुकीवर नजर ठेवून होते.
अनगोळ तलावात सार्वजनिक गणपती विसर्जन
अनगोळ येथील कांही सार्वजनिक मंडळाचे गणपती हे नाथ पै नगर येथील श्री भक्त पुंडलिक विसर्जन तलावाजवळ विसर्जनासाठी रात्री उशिरा दाखल झाले. यात सार्वजनिक गणेशोत्सव लक्ष्मी गल्ली, बाबासाहेब आंबेडकर नगर, कोनवाळ तसेच भांदूर गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाचे गणपती तलावात विसर्जनासाठी दाखल झाले आणि विसर्जन सुरळीतपणे पार पडले. यावेळी महानगरपालिकेच्या वतीने याठिकाणी क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती तसेच सफाई कर्मचारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते.









