खानापूर : शहर परिसरात अनेक घरांमध्ये पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. या गणरायाला बुधवारी सायंकाळी भावपूर्ण निरोप देण्यात आला. तसेच शासकीय कार्यालयातील गणपतींना पाचव्या दिवशी निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या… अशा घोषणा देत तसेच फटाक्यांची आतषबाजी, संगीत आणि ढोलताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. सायंकाळी 5 नंतर मलप्रभा नदीघाटावर गणेशभक्तांची एकच गर्दी झाली होती. विशेषत: बुधवारी सायंकाळी खानापूर शहरासह ग्रामीण भागात विसर्जन ठिकाणी नदी, तलाव, विहीर परिसरात नागरिकांची गर्दी दिसून आली. रात्री उशिरापर्यंत घरगुती तसेच शासकीय मूर्तींचे विसर्जन सुरूच होते.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी सायंकाळच्या वेळेस खानापूर मलप्रभा काठावर गणेशभक्तांची गर्दी झाली होती. फटाक्यांच्या आतषबाजीत गणेशमूर्तेंचे विसर्जन करण्यात आले. दीड दिवसाच्या गणरायांना रविवारी निरोप देण्यात आला आहे. त्यानंतर बुधवारी पाचव्या दिवशी घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन मोठ्या प्रमाणात करण्यात आले. तसेच शासकीय कार्यालयातील गणरायांचेही सायंकाळी विसर्जन करण्यात आले. यासाठी गणराया आऊढ झालेल्या वाहनावर विद्युतरोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी जि. पं. उपविभाग, तहसीलदार कार्यालय, हेस्कॉम, पोलीस स्टेशन तसेच परिवहन खात्याच्या गणरायांचे विसर्जन करण्यात आले.
आजही गणपतीचे विसर्जन होणार
यावर्षी शासकीय गणपतींचे विसर्जन देखील मलप्रभा नदीघाटाजवळील नवीन पूलवजा बंधाऱ्यावरच करण्यात आले. सायंकाळी गणेशमूर्तीची विधिवत पूजा आणि आरती झाल्यानंतर कुटुंबीयांसह अबालवृद्धांनी भक्तिपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला. काही घरातून मूळ नक्षत्रावर गौरी गणपतीचे विसर्जन करण्याची प्रथा असल्याने यावर्षी सहाव्या दिवशी मूळ नक्षत्र आल्याने आज गुरुवारीही गणपतीचे विसर्जन मोठ्या प्रमाणात होणार आहे.









