एकंबे :
कोरेगाव शहराच्या प्रवेशद्वारावर वसना नदी पात्रावर ब्रिटिशकालीन पुलाच्या जागी नवीन उंच पूल उभारावा. या पुलाचे काम तातडीने सुरू करावे. शहरातील रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावावीत, असे स्पष्ट निर्देश अपर जिल्हाधिकारी मलिकार्जुन माने यांनी दिले.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी अपर जिल्हाधिकारी मलिकार्जुन माने यांच्या अध्यक्षतेखाली महामार्गाच्या प्रलंबित कामाविषयी महत्वपूर्ण बैठक झाली. त्यावेळी त्यांनी निर्देश दिले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली चर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनी बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्ग, सचिन बर्गे, नितीन उर्फ बच्चूशेठ ओसवाल, नगरसेवक सागर विरकर, संतोष नलावडे, प्रदीप बोतालजी यांच्यासह विकास आघाडीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
रस्ते विकास महामंडळ्ळाव्या महिला कार्यकारी अभियंता यांनी मेघा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीच्या दिरंगाईमुळे सदरची कामे रखडली असल्याचे सांगितले, या कंपनीकडून काम काढून घ्यावे, यासाठी प्रस्ताव मंत्रालयात सादर केला असल्याचेही सांगितले. २०१३ साली सदरचे काम मंजूर झाले असून त्यावेळी या कामांना जिओ टॅगिंगची सुविधा नव्हती त्यामुळे प्रत्यक्षात किती काम झाले आणि किती अपूर्ण आहे, याबाबत माहिती देता येणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ठेकेदार कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर यांनी केवळ वेळकाढूपणा करत येत्या पंधरा दिवसात काम सुरू करत असल्याचे सांगितले. राहूल बर्गे यांनी रस्ते विकास महामंडळ आणि ठेकेदार कंपनीने चुकीची माहिती प्रशासनाला देऊ नये, असे स्पष्ट करत प्रशासनाने वस्तुस्थिती पहावी आणि मगच निर्णय घ्यावा, अशी विनंती केली.
शहराच्या प्रवेशद्वारावर ब्रिटिशकालीन पुलाच्या ठिकाणी नवीन उंच पूल उभारण्याची मागणी आमदार महेश शिंदे यांनी यापूर्वीच केली आहे. सध्याच्या ठिकाणी दुसरा पूल उभारला तरी तो कमी उंचीचा होणार आहे. शहरातील साखळी पुलाच्च्या ठिकाणी नवीन उंच पूल उभारणी आवश्यक असल्याचेही बर्गे यांनी निदर्शनास आणून दिले. एकूणच रस्ते विकास महामंडळ आजच्या बैठकीत आपली जबाबदारी झटकत असल्याचे स्पष्ट झाले. महेश बर्गे यांनी ठेकेदार कंपनीने पोट ठेकेदार नेमल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असल्याचा आरोप केला. ठेकेदार कंपनीमुळे अनेक अपघात झाले असून काही जणांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात कोरेगाव पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत तरी देखील ठेकेदार कंपनी जुमानत नसेल तर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारावा, अशी विनंती केली. अपर जिल्हाधिकारी मलिकार्जुन माने यांनी मुख्याधिकारी विनोद जळक यांना कामांचा आढावा घेऊन कामे मार्गी लावण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर रस्ते विकास महामंडळाला ठेकेदार कंपनी बाबतचे निर्णय प्रक्रिया लवकर राबविण्याचेही आदेश दिले.
- आमदार महेश शिंदे घेणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट
बैठकीत झालेल्या चर्चेची आणि निर्णयाची माहिती प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी पत्रकारांना दिली. आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीने पत्रव्यवहार करून जिल्हा प्रशासनाला रस्ते विकास महामंडळ आणि ठेकेदार कंपनी करत असलेल्या दुर्लक्षाबाबत माहिती दिली होती. जिल्हा प्रशासनाने आज बैठक घेऊन चर्चा केली आहे, मात्र त्यातून फलनिष्पत्ती बऱ्यापैकी झाली असली तरी अपेक्षित काम गतीने पूर्ण करू शकत नाही. आमदार महेश शिंदे यांच्या निदर्शनास या बाबी आणून दिल्या असून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत








