निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा
बेळगाव : अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौक ते रघुनाथपेठपर्यंतच्या रस्त्यावर ड्रेनेज पाईपसाठी खोदाई करण्यात आली होती. पाईप घालून रस्त्याची चर बुजविण्यात आली आहे. मात्र रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे अनगोळच्या शेवटच्या बस थांब्यापर्यंत बस सोडली जात नाही. यापूर्वी देखील महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते. तरी देखील त्याची दखल घेतली नाही. यामुळे आता आम्ही शेवटचे निवेदन देत असून, त्यानंतर त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. महापौर सविता कांबळे यांना निवेदन देण्यात आले. अनगोळमध्ये विविध कामे करण्यात आली. मात्र 500 मीटरच्या रस्त्याचे काम थांबविण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. जवळपास दीड ते दोन कि. मी. चालत यावे लागत आहे. अनगोळ येथील मराठी शाळेसमोरच बस थांबविल्या जात आहेत. तेव्हा सारासार विचार करून केवळ 500 मीटरच्या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आठ दिवसांत दुरुस्तीची मागणी
आठ दिवसांत दुरुस्ती झाली नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक कामे अर्धवटच आहेत. ती कामे देखील महापालिकेने पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली. माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी हे निवेदन दिले आहे.









