महिलांचा जिल्हाधिकारी-जिल्हा पंचायत कार्यालयावर मोर्चा : पीडीओंना धरले धारेवर
बेळगाव : मोदगा गावातील ताशिलदार गल्लीमध्ये रस्त्यावरच काही जणांनी अतिक्रमण केल्यामुळे ये-जा करण्यासाठी नागरिकांना जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे जवळपास 25 कुटुंबांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत ग्राम पंचायतीला कळवून देखील त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मोदगा ग्रामस्थांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात येवून निवेदन दिले. याचबरोबर जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले.n ताशिलदार गल्लीमध्ये एकाने अतिक्रमण करून इमारत उभी केली आहे. तर दुसऱ्या बाजूच्या व्यक्तीने तारेचे कुंपण घातले आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करणे अवघड जात आहे. तार लागून अनेक जण जखमी होत आहेत. ग्राम पंचायत व पीडीओ याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला आहे. रस्त्यावर अतिक्रमण होवून देखील ग्राम पंचायत कोणतीच कारवाई करण्यास तयार नाही. यामुळे या महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांच्याकडे त्या महिला गेल्या. त्याठिकाणी जोरदार वादावादी झाली. हर्षल भोयर यांनी पीडीओला तातडीने बोलावून घेतले. समस्या सोडविण्यासाठी सांगितले असता न्यायालयात वाद सुरू आहे, असे सांगितले. मात्र न्यायालयातून स्थगिती मिळाली आहे का? असा प्रश्न हर्षल भोयर यांनी केला. यावर पीडीओंनी उत्तर देण्याचे टाळले. त्यामुळे पीडीओ प्रकाश कुडची यांना चांगलेच धारेवर धरले.
जिल्हा पंचायतमध्ये वादावादी
यावेळी महिलांनीही पीडीओबद्दल अनेक तक्रारी सांगितल्या. त्यांच्यावरच प्रथम कारवाई करा, अशी मागणी केली. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याच कक्षामध्ये जोरदार वादावादी झाली. यामुळे पोलिसांनी महिलांना बाहेर काढले. त्यामुळे बराच गोंधळ उडाला होता.









