प्रतिनिधी /काणकोण
गालजीबाग येथील सेंट ऍंथनी हायस्कूलच्या समोर आणि येथील खाजगी प्राथमिक शाळेच्या इमारती जवळ असलेले, वाळलेले मात्र धोकादायक बनलेले झाड जर त्वरित कापले नाही तर या ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या झाडालगत असलेल्या घराचे मालक पातेलियांव बार्रेटो, फेर्मिना बार्रेटो त्याच प्रमाणे सेबी बार्रेटो यानी स्थानिक पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
या ठिकाणी वीज खात्याची उच्च दाबाची वीज वाहिनी त्याच प्रमाणे कमी दाबाची वीज वाहिन्या गेलेल्या आहेत. वाळलेले झाड समोर असलेल्या एका माडाच्या आधारामुळे उभे आहे. हा माड जर नसता तर झाड कधीच कोसळले असते. हे वाळलेले धोकादायक झाड जर पावसाळय़ापूर्वी कापले नाही तर समोरच्या वीज वाहिन्यावर पडण्याची शक्यता आहे. लवकरच शाळा सुरू होणार आहेत. आणि तसे झाल्यास या वाडय़ावरील घरगुती वापराच्या वीज उपकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
या संबधीचे लेखी निवेदन 24 एप्रिल रोजी स्थानिक वीज खात्याला देण्यात आले होते मात्र, वीज खात्याकडे आवश्यक तेवढी उपकरणे नसल्याचा खुलासा वीज खात्याकडून करण्यात आला. आपल्या गावात बेकार युवक आहेत. त्यांच्याजवळ आवश्यक ती हत्यारे आहेत त्याचा वापर वीज खात्याने करावा आणि हे धोकादायक झाड हटवावे अशी मागणी यावेळी स्थानिक नागरीक सेबी बार्रेटो यानी केली.
काणकोणच्या आपत्कालिन व्यवस्थापन समितीने मान्सून पुर्व कामाचा आढावा घेण्यासाठी नुकतीच बैठक घेतली होती. त्या बैठकीत या धोकादायक झाडा संबधी चर्चा करण्यात आली नाही की काय असा सवाल करून काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन भंडारी यानी सरकारी यंत्रणेवर यावेळी बोलताना आगपाखड केली आणि हे सरकार लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप केला. त्याच बरोबर हे धोकादायक झाड त्वरित हटविण्याची जोरदार मागणी केली.









