इमारत जीर्ण होऊन पडझड झाल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात धोका
वार्ताहर/कणकुंबी
कणकुंबी येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या आवारात असलेली आरोग्य खात्याची कर्मचारी निवासी इमारत जीर्ण व अतिशय धोकादायक बनलेली असून शालेय विद्यार्थ्यांना सदर इमारतीपासून धोका निर्माण झाला आहे. मंडळ पंचायत अस्तित्वात असताना आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी बाजार गल्लीत प्राथमिक शाळा इमारतीला लागून बांधण्यात आली होती. सुरुवातीची काही वर्षे सदर इमारत सुस्थितीत होती. प्रारंभीच्या काळात त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी रहात होते. परंतु अलीकडच्या काही वर्षांमध्ये त्या ठिकाणी कोणी रहात नसल्याने सदर इमारतीची पडझड झाली आहे. दरवाजा, खिडक्या मोडून पडले आहेत. तसेच छप्पर आणि इमारत गवत व झुडपांनी व्यापून गेले आहे. पाठीमागच्या बाजूने उंदरांनी मातीचे ढिगारे काढल्याने त्या ठिकाणी साप, विंचू व अन्य प्रकारचे कीटक वास्तव्य करत आहेत. सदर धोकादायक इमारत शाळेच्या इमारतीलाच लागून आहे. त्या ठिकाणी शालेय विद्यार्थी पटांगणावर खेळत असतात मात्र या धोकादायक व जीर्ण झालेल्या इमारतीचा विद्यार्थ्यांना धोका पोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इमारत म्हणजे मद्यपींचा अड्डा
सध्या बेवारस असलेली इमारत म्हणजे मद्यपींचा अड्डा बनला आहे. शाळा सुधारणा समितीने सदर जीर्ण झालेली धोकादायक इमारत त्वरित हटवावी अशा प्रकारची मागणी शाळा सुधारणा कमिटीने ग्राम पंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच रात्रीच्या वेळी या इमारतीच्या व्हरांड्यात काही मद्यपीकडून बाटल्या, ग्लास व खाण्याचे काही पदार्थ टाकले जातात. त्याचाही परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होत असल्याने ही धोकादायक इमारत त्वरित हटवावी, अशी मागणी गावातील शिक्षणप्रेमी नागरिक व शाळा सुधारणा कमिटीने केली आहे.









