गोडावूनच्या जागेतच वाहने पार्किंगची करण्याची मागणी
बेळगाव : महानगरपालिकेचे कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांचे गोडावून सदाशिवनगर येथील स्मशानभूमीला लागूनच आहे. वाहनांची संख्या अधिक असल्याने गोडावूनला जागा कमी पडत आहे. त्यामुळे स्मशानभूमीमध्ये कचरा वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मनपाने स्मशानभूमीच्या जागेमध्ये वाहने पार्किंग न करता गोडावूनच्या जागेतच पार्किंग करावी, अशी मागणी होत आहे. मनपाच्या आरोग्य व शिक्षण स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कचरा वाहने पार्किंग करू नयेत, अशी सूचना करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवस या ठिकाणी वाहने पार्किंग करण्याचे बंद झाले होते. मात्र आता पुन्हा या स्मशानभूमीच्या जागेमध्येच कचऱ्याची वाहने पार्किंग केली जात आहेत. दिवसभर या ठिकाणी ही वाहने थांबून राहत आहेत. त्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेने पुन्हा एकदा संबंधित अधिकाऱ्यांना तेथील वाहने हटविण्याची सूचना करावी. तसेच या परिसरातील कचरा देखील हटवावा, अशी मागणी होत आहे.









