खड्डा चुकविताना वाहनांच्या वारंवार अपघाताच्या घटना
बेळगाव : कलखांब येथील मुख्य गोकाक-बेळगाव रस्त्यावर निर्माण झालेला खड्डा वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. खड्डा चुकविताना वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डा बुजिवण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे गोकाक-बेळगाव या मुख्य रस्त्यावर कलखांब गावाजवळील रस्त्याचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डा निर्माण झाले आहेत. मुख्य वाहतुकीचा रस्ता असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. या रस्त्यावरूनच या भागातील 15 ते 20 गावातील ग्रामस्थांना शहराकडे रोजगारासाठी यावे लागते. त्यामुळे रस्ता नेहमी वाहनांच्या गर्दीने फुललेला असतो. अशा परिस्थितीत निर्माण झालेला खड्डा वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. पावसाचे पाणी साचून खड्ड्याचा अंदाज लागत नसल्याने अपघात घडत आहेत. तर अनेकवेळा खड्डा चुकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनचालकांना समोरून येणाऱ्या वाहनाची धडक बसली आहे. यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. वेगवान रस्त्यावर निर्माण झालेला खड्डा जीवघेणा ठरत आहे. विशेष करून रात्रीच्या वेळी वाहनांना अपघात घडत आहेत. बांधकाम खात्याने याकडे त्वरित लक्ष देऊन धोकादायक खड्डा बुजविण्यात यावा, अशी मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.









