अर्थ स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांची मागणी
बेळगाव : माजी नगरसेविका व तिच्या पतीने बालनिवास केंद्रासाठी महापालिकेकडून जागा मंजूर करून घेतली. मात्र त्याठिकाणी सर्व नियम तोडून दुकानगाळे करून ते भाड्याने दिले आहेत. त्याचा करही भरण्यात आला नाही. त्यामुळे संबंधित इमारतीला टाळे ठोकावेत, असा ठराव मनपाच्या अर्थ, स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. महापालिकेला कर मिळावा यासाठी महापालिकेच्या जागांमध्ये दुकानगाळे करून त्याचा लिलाव केला जातो. मात्र एका नगरसेविकेनेच कनकदास स्कूल आणि बालनिवास केंद्र सुरू करण्यासाठी महापालिकेची एक एकर जागा घेतली. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बालनिवास केंद्र किंवा शाळा सुरू केली नाही. उलट त्या ठिकाणी दुकाने सुरू केली आहेत.
सदर गाळे बांधण्यासाठी देण्यात आलेली परवानगीही बेकायदेशीर आहे. अनेक वर्षांचा कर भरला नाही. तरीदेखील त्यांना परवानगी दिली आहे. महापालिकेचे जवळपास दीड कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी परवानगी दिलेला अधिकारी निवृत्त झाल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. निवृत्त झाले तरी त्यांच्यावर कारवाई करता येते का? याची चाचपणी स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. स्थायी समितीच्या अध्यक्षा वीणा विजापुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अधिकाऱ्यांची चांगलीच पोलखोल झाली. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी कशाप्रकारे बेकायदेशीर कामे केली आहेत, याचबरोबर होत आहेत, याचा पाढाच नगरसेवकांनी वाचला. नगरसेवक हणमंत कोंगाली, रवी धोत्रे यांच्यासह इतर नगरसेवकांनी याविरोधात जोरदार आवाज उठविला. कायदा सल्लागार अॅड. महांतशेट्टी यांनी कायद्याबाबतची माहिती दिली. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याबाबत सूचना केली आहे. बेकायदेशीर कामांबाबत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यावेळी अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली होती. गाळे लिलाव करताना महापौर, उपमहापौर तसेच स्थायी समितीच्या अध्यक्षांना प्रथम विश्वासात घ्या, त्यांना याबाबतची प्रत द्या, त्यानंतरच गाळे लिलाव प्रक्रिया राबवा, असे सुनावण्यात आले. पूर्वीपासून व्यवसाय थाटून बसलेल्या गाळेधारकांना प्रथम लिलावात भाग घेण्यास मुभा द्या. त्यानंतर इतरांना त्याठिकाणी गाळे घेण्यासाठी प्राधान्य द्या, असेही सांगण्यात आले.
आम्ही जनतेची कामे करण्यासाठी येतो
आम्हाला जनता कामे करण्यासाठी निवडून सभागृहात पाठविते. मात्र जर आम्हीच गैरप्रकार केले तर ते योग्य नाही. तेव्हा भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज असल्याचे महापालिकेच्या सभागृहातील विरोधी गटनेते मुज्जमील डोणी यांनी सांगितले. बेळगाव वनमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू आहे. त्याबाबत पाऊल उचलण्याची गरज असल्याचे बैठकीत सांगितले. बैठकीला उपमहापौर रेश्मा पाटील, उपायुक्त रेश्मा तालिकोटी, भाग्यश्री हुग्गी यांच्यासह अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.









