भाजप पदाधिकाऱ्यांचे पोलीस आयुक्तांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
विधानसौधच्या आवारात विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पोलीस आयुक्तांकडे केली. पोलीस आयुक्त कार्यालयात आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
दि. 19 डिसेंबर रोजी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या आवारात सी. टी. रवी यांच्यावर हल्ला झाला आहे. हल्लेखोरांना अद्याप का अटक झाली नाही? असा प्रश्न भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे. यावर पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी हे प्रकरण आता सीआयडीकडे आहे. त्यामुळे पुढील कारवाई सीआयडीचे अधिकारी करणार आहेत, असे सांगितले.
भाजपचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, महानगर जिल्ह्याच्या गीता सुतार, नगरसेवक श्रेयस नाकाडी, उज्ज्वला बडवाण्णाचे, शिल्पा केकरे आदींसह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भाजपचे पदाधिकारी आयुक्त कार्यालय आवारात दाखल झाले, त्यावेळी गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. त्यामुळे पोलीस आयुक्त व उपायुक्तांनी बैठकीतून येऊन त्यांचे निवेदन स्वीकारले.









