गोल्डन आवर्समध्येच सायबरला माहिती द्या : जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद
बेळगाव : ऑनलाईनच्या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. मार्केटींगच्या नावाने व पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून लूट केली जात आहे. नागरिकांची अशा प्रकारची लूट होताच तात्काळ 1930 या क्रमांकावर तासाच्या आत (गोल्डन आवर्स) माहिती देऊन तक्रार दाखल केली पाहिजे. तरच सायबर गुन्हेगारांना रोखणे शक्य आहे. लूट झालेली रक्कम गोठविता येते. विलंब झाल्यास तपास लावणे अत्यंत कठीण आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. संघ-संस्थांकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आल्याचे सर्वश्रुत आहे. असे असतानाही अनेक नागरिक ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून तसेच दामदुप्पट पैसे कमविण्याच्या आशेपाई फसले जात असल्याची प्रकरणे पोलीस खात्याकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यामध्ये नुकताच दामदुप्पट पैसे करण्याचे आमिष दाखवून उच्चविद्याविभूषित व व्यावसायिकांची समाज माध्यमांद्वारे फसवणूक करण्यात आली आहे. 73 लाख, 52 लाख व 23 लाखाला अशा प्रकारे तिघा जणांना लुटण्यात आले आहे.
उच्चविद्याविभूषित जोडप्याला दामदुप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखवून 73 लाखाला लुटण्यात आले आहे. सदर जोडप्याकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून 36 लाख गोठविणे शक्य झाले आहे. तर 52 लाखांच्या प्रकरणात 8 लाख गोठविणे शक्य झाले आहे. तसेच 23 लाख फसवणूक प्रकरणाचा तपास केला जात आहे. अशाप्रकारे नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यासाठी पोलीस खात्याकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये नागरिकांनीही अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. फोनवर विचारलेल्या माहितीवरून प्रतिसाद देताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. ऑनलाईन लूट होताच नागरिकांनी तात्काळ 1930 या क्रमांकावर संपर्क साधून तासाच्या आत माहिती देणे गरजेचे आहे. हा एक तास म्हणजे गोल्डन आवर्स असतो. या कालावधीत आर्थिक फसवणूक रोखणे सायबर खात्याला शक्य आहे. यासाठी या संधीचा त्वरित लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.









