केलंबो / वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आर्थिक दिवाळखोरीशी दोन हात करणाऱया श्रीलंकेला मोठाच दिलासा दिला आहे. या वित्तसंस्थेने या देशासाठी 3 अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त अर्थसाहाय्य योजनेला संमती दिली आहे. यामुळे श्रीलंकेला आर्थिक आधार मिळणार असून आपली पत सुधारण्याची संधीही मिळणार आहे. या साहाय्यामुळे या देशाचे आर्थिक स्थैर्य सांभाळले जाणार आहे.
श्रीलंकेत आर्थिक स्थिरता निर्माण व्हावी, तसेच कर्ज फेडण्याची त्या देशाची क्षमता वाढावी यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. कर्ज फेडण्याची कुवत वाढल्यास या देशाची आर्थिक पत सुधारु शकते. म्हणून ही योजना आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने यासंबंधात श्रीलंकेशी करार केला असून तो या संस्थेचा या देशाशी केलेला आतापर्यंतचा 17 वा करार आहे. या कराराचा अहवाल मंगळवारी सादर करण्यात आला. श्रीलंकेच्या दुर्बळ आर्थिक स्थितीला तेथील प्रचंड भ्रष्टाचार कारणीभूत आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाराची स्थिती जाणून घेण्यासाठी, तसेच आर्थिक कुव्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी आयएमएफने समिती स्थापन केली आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल देणार आहे.
1 वर्षापूर्वी श्रीलंकेने कर्जफेड करण्याची क्षमता नसल्याची घोषणा केली होती. तेव्हापासून त्या देशाचे आयएमएफकडे प्रयत्न सुरु होते. श्रीलंकेकडील डॉलरचा साठा त्यावेळी रसातळाला गेला होता. त्यामुळे देश दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर उभा होता. तथापि, आता आपला देश कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, असा विश्वास त्या देशाचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंगे यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या या साहाय्यमुळे श्रीलंका आता 7 अब्ज डॉलर्सपर्यंतचे कर्ज उभे करु शकणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.









