बेळगाव : आयएमईआर आणि क्वेस्ट टूर्स यांच्यावतीने आयएमईआरच्या विद्यार्थ्यांसाठी दुबई अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. एकूण पाच दिवसांच्या दौऱ्यात विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक व सामाजिक स्थळांना भेटी देऊन माहिती घेतली. या अभ्यास दौऱ्यामध्ये एकूण 33 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी डो क्रूझ डिनरचा आनंद घेतला. या ठिकाणी नृत्य, संगीत आणि सांस्कृतिक शोज यांचाही लाभ त्यांना मिळाला. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी दुबई येथील विविध संग्रहालये व दुबई मॉलला भेट दिली.
येथे किरकोळ खरेदीचा आनंद घेऊन त्यांनी जगातील सर्वात उंच अशा बुर्ज खलिफा या इमारतीला भेट दिली. या इमारतीच्या 124 व्या मजल्यावरून विद्यार्थ्यांनी संपूर्ण दुबई शहर कसे दिसते याचा अनुभव घेतला. तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी मणिपाल विद्यापीठाला भेट दिली. तेथील प्राध्यापकांशी विद्यार्थ्यांनी संवाद साधून विद्यापीठाचे कामकाज कसे चालते, विद्यापीठामध्ये कोणत्या सुविधा व संधी आहेत याची माहिती घेतली. दुपारनंतर गोल्डसुख मार्केटला भेट दिली. चौथ्या दिवशी मीना बाजारला भेट दिल्यानंतर डेझर्ट सफारीचा व उंंट सफारीचा आनंद त्यांनी घेतला.
पाचव्या दिवशी दुबईच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देऊन या कामाची माहिती त्यांनी घेतली. याच दरम्यान त्यांनी दुबईमधील हिंदू मंदिर, फेरारी वर्ल्ड तसेच स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असणाऱ्या मशिदीला भेट दिली. या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक, सांस्कृतिक क्षेत्रातील बदल यांची माहिती मिळाली. तसेच सांघिकता किती महत्त्वाची आहे, याचाही अनुभव आला. या सर्व विद्यार्थ्यांना प्रा. श्रीरंग देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. अभ्यास दौऱ्यासाठी प्रा. अजय जमनानी, प्रा. गौतमी मागनूर, आयएमईआरचे संचालक डॉ. आरिफ शेख, कॉलेजच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन आर. एस. मुतालिक यांचे सहकार्य मिळाले. या दौऱ्याच्या नेटक्या आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांनी व आयएमईआरच्या संचालकांनी क्वेस्ट टूर्सला धन्यवाद दिले.









