वृत्तसंस्था/ मुल्तान
विंडीजचा क्रिकेट संघ पाकच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. सदर कसोटी मालिका ही आयसीसीच्या विश्वचषक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत राहिल. या मालिकेसाठी पीसीबीने 15 सदस्यांचा संघ जाहीर केला असून इमाम उल हक आणि फिरकी गोलंदाज अब्रार अहमद यांचा समावेश केला आहे.
उभय संघातील पहिली कसोटी मुलतानमध्ये 17 ते 21 जानेवारी तर दुसरी कसोटी मुल्तानमध्ये 25 ते 29 जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. अलिकडेच पाक क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. मात्र पाक संघाला कसोटी मालिका गमवावी लागली होती. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या पाक संघातील सात खेळाडुंना विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वगळण्यात आले आहे. कर्णधार शान मसूद, सौद शकिल, बाबर आझम, कमरान गुलाम, खुर्रम शेहजाद, मोहम्मद रिझवान, नौमन अली आणि सलमान आगा यांनी मात्र संघातील स्थान कायम राखले आहे. पाक संघाची गोलंदाजी भक्कम करण्यासाठी साजिद खानला आता अब्रार अहमदची मदत मिळेल. सईम अयुब आणि अब्दुल्ला शफिक यांना मात्र या मालिकेसाठी वगळले आहे. अमीर जमाल, मोहम्मद अब्बास, मीर हमझा आणि नसीम शहा यांना मात्र विश्रांती देण्यात आली आहे. शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाक संघाला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात कसोटी मालिका 0-2 अशी गमवावी लागली. दक्षिण आफ्रिकेने मायदेशातील मालिकेत पाकचा पराभव करत आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. सध्या या स्पर्धेच्या गुणतक्त्यात पाकचा संघ आठव्या स्थानावर आहे. विंडीजचा क्रिकेट संघ तब्बल 18 वर्षांनंतर पाकमध्ये कसोटी मालिका खेळत आहे.
पाक संघ : शान मसूद (कर्णधार), सौद शकिल (उपकर्णधार), बाबर आझम, मोहम्मद रिझवान, इमाम उल हक, कमरान गुलाम, मोहम्मद हुरेरा, रोहेल नझीर, नौमन अली, साजिद खान, अब्रार अहमद, सलमान आगा, मोहम्मद अली, खुर्रम शेहजाद आणि कासिफ अली.









