वृत्तसंस्था/ होबार्ट
डब्ल्यूटीए टूरवरील शनिवारी येथे झालेल्या होबार्ट आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेची 22 वर्षीय महिला टेनिसपटू इमा नेव्हारोने एकेरीचे जेतेपद मिळवताना बेल्जियमच्या इलेसी मर्टन्सचा पराभव केला.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात नेव्हारोने मर्टन्सचे आव्हान 6-1, 4-6, 7-5 असे संपुष्टात आणले. या सामन्यात नेव्हारोने वेगवान आणि अचूक सर्व्हिस तसेच जमिनीलगतच्या फटक्याच्या जोरावर पहिला सेट 6-1 असा एकतर्फी जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये मर्टन्सने आपल्या चुका सुधारत नेव्हारोशी बरोबरी करताना दुसरा सेट 6-4 असा जिंकला. तिसरा अपेक्षेप्रमाणे चुरशीचा झाला पण नेव्हारोने बेसलाईन खेळावर अधिक भर देत मर्टन्सचे आव्हान संपुष्टात आणले. मर्टन्सने होबार्ट टेनिस स्पर्धेत 2017 आणि आणि 2018 साली सलग विजेतेपद मिळवले होते. 2018 साली मर्टन्सने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. सोमवारपासून मेलबोर्नमध्ये सुरु होणाऱ्या 2024 च्या टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत नेव्हारोची सलामीची लढत चीनच्या वेंग झियुशी होणार आहे.









