चर्चा अँडरसनची निवृत्ती मात्र ब्रॉडची
वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली. ब्रॉड हा ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पाचव्या अॅशेस कसोटी सामन्यानंतर निवृत्त होणार आहे. त्याने याबाबतची घोषणा शनिवारी तिसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर केली. पाचव्या कसोटीपूर्वी जेम्स अँडरसन निवृत्ती घेणार अशी चर्चा होती. त्याने स्पष्टपणे नकार दिला. मात्र 37 वर्षीय स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्तीची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला आहे.
अॅशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत खेळत असलेल्या ब्रॉडने ओव्हलवर तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर सांगितले की, ‘उद्या म्हणजेच सोमवार हा माझा क्रिकेटमधील शेवटचा सामना असेल. हा एक अविस्मरणीय असा प्रवास आहे. नॉटिंगहॅमशायर आणि इंग्लंडकडून खेळणे माझ्यासाठी बहुमानाची गोष्ट आहे. मी अॅशेसचा एक भाग राहू शकलो ही सर्वात आनंददायक गोष्ट आहे’, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. विशेष म्हणजे, इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये 600 विकेट्स घेणारा तो दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे आणि जगातील एकूण गोलंदाजांपैकी तो पाचवा गोलंदाज आहे. तसेच जेम्स अँडरसननंतर ब्रॉड हा इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.
ब्रॉडची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
2007 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला सलग सहा चेंडूत सहा षटकार ठोकले होते. त्यामुळे तो भारतात चांगलाच प्रसिद्ध आहे. टी-20 वर्ल्डकपमधील या घटनेनंतर ब्रॉडचे करिअर संपणार अशी चर्चा झाली मात्र, यामुळे खचून न जाता ब्रॉडने टी-20, वनडेपेक्षा कसोटी क्रिकेटमध्ये मोठा माइल्स्टोन गाठला. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत त्याने 845 विकेट्स घेतल्या आहेत. ब्रॉडने 2007 साली श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कसोटीमध्ये त्याने 602 बळी घेतले आहेत. 30 ऑगस्ट 2006 रोजी पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ब्रॉडने शेवटचा वनडे सामना 14 फेब्रुवारी 2016 रोजी द.आफ्रिकेविरुद्ध खेळला. ब्रॉडने 121 एकदिवसीय सामन्यांमध्ये 178 विकेट्स आणि 56 टी-20 सामन्यांमध्ये 65 बळी घेतले आहेत. तसेच ब्रॉडने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 3656 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 1 शतक आणि 13 अर्धशतके झळकाली आहेत. याशिवाय वनडेमध्ये 529 धावा आणि टी-20 सामन्यांमध्ये 118 धावा आहेत.
ईसीबीकडून ब्रॉडला शुभेच्छा
दरम्यान, ब्रॉडच्या खास फोटोसह इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याचे आभार मानले आहेत. तसेच इंग्लंडच्या क्रिकेटमध्ये ब्रॉडचे विशेष योगदान असल्याचे ट्विटही त्यांनी केले आहे. ब्रॉड हा इंग्लंडच्या 2010 टी-20 विश्वचषक विजेत्या आणि चार वेळा अॅशेस विजेत्या संघाचा भाग आहे.
प्रतिक्रिया
‘ऑस्ट्रेलियन संघ आणि अॅशेस मला अधिक प्रिय आहे. मला वाटत होते की माझी शेवटची फलंदाजी आणि गोलंदाजी अॅशेसमध्ये व्हावी आणि मग त्याच ठिकाणी मी निवृत्ती घोषित करेन. ही माझी इच्छा इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मान्य केली’.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज, स्टुअर्ट ब्रॉड
स्टुअर्ट ब्रॉडविषयी थोडेसे –
- घरच्या मैदानांवर ब्रॉडच्या 396 विकेट्स आहेत. घरच्या मैदानावर तो मुथय्या मुरलीधरन (493) आणि जेम्स अँडरसन (434) नंतर सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.
- ब्रॉडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत 151 बळी घेतले आहेत, जे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही इंग्लिश गोलंदाजापेक्षा सर्वाधिक आहे. ब्रॉडने इयान बोथमचा 148 बळींचा विक्रम मागे टाकला. शेन वॉर्न (195) आणि ग्लेन मॅकग्रा (157) यांच्या नंतर अॅशेसमध्ये सर्वाधिक बळी घेणारा तो तिसरा गोलंदाज आहे.
- ब्रॉड हा असा गोलंदाज आहे, ज्याने कसोटीमध्ये किमान 10 वेळा 6 फलंदाजांना बाद केले आहे. इतर कोणत्याही गोलंदाजाने असा पराक्रम केला नाही. ग्लेन मॅकग्रा, कर्टली अॅम्ब्रोस, कपिल देव, माल्कम मार्शल आणि कोर्टनी वॉल्श यांनी कसोटी क्रिकेटमध्ये किमान 10 वेळा पाच फलंदाजांना बाद केले होते.
- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत तो सचिन तेंडुलकर (200), जेम्स अँडरसन (183), रिकी पाँटिंग (182), स्टीव्ह वॉ (168) यांच्यानंतर सहाव्या क्रमांकावर आहे.
- अॅडरसन-ब्रॉड कसोटीच्या इतिहासातील सर्वोत्तम जोडी. अँडरसन-ब्रॉडने शेन वॉर्न आणि ग्लेन मॅकग्रा यांना पछाडत सर्वात यशस्वी कसोटी जोडीचा मान पटकावला होता. वॉर्न आणि मॅकग्रा यांनी सोबत खेळताना 1001 कसोटी विकेट्स घेतल्या होत्या, तर अँडरसन-ब्रॉड जोडीने 1037 कसोटी विकेट्स घेत यादीत पहिला क्रमांक पटकावला होता.