आमदार दिगंबर कामत यांचे स्पष्टीकरण
मडगाव : मडगावचे आमदार दिगंबर कामत हे दक्षिण गोवा लोकसभा निवडणूक लढवून लवकरच केंद्रात जातील आणि मडगाव मतदारसंघांत त्यांच्या जागेवर त्यांचे पूत्र योगीराज निवडणूक लढवतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सध्या चालू आहे तिला पूर्ण विराम देताना दिगंबर कामत म्हणाले की, ‘मी केंद्रात जाणार या फक्त वावड्या आहेत आणि आपल्याला तसे कुणी विचारलेले नाही. आपण जिथे आहे तिथे ठिक आहे’. दिगंबर कामत आपल्या मुलाला राजकारणात ‘प्रोमोट’ करतात का ? असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असता, आपण कुणालाही प्रोमोट करत नाही. राजकारणात कुणीही प्रवेश करायचा असेल तर तो आपल्या हिमतीवर करायचा असतो. योगीराज यालाही तेच तत्व लागू होत आहे. तो राजकारणात आला तर स्वत:च्या हिमतीवर येईल, दुसऱ्यांच्या नव्हे असे त्यांनी सांगीतले.
अजून मडगावचा आमदार मी आहे
दिगंबर कामत कुठेही जावोत, त्यांचे चिरंजीव योगीराज हे त्यांच्याबरोबर असतात. त्यामुळे योगीराज हेच त्यांचे मडगाव येथील उत्तराधिकारी अशी लोकांत चर्चा आहे. यावर खुलासा करताना कामत म्हणाले, अजून मी मडगावचा आमदार आहे. त्यामुळे मी आमदार असताना कुणी माझा उत्तराधिकारी असूच शकत नाही.
योगीराजचे आपण सहाय्य लाभते
योगीराज माझ्याबरोबर का असतो याचे उत्तर असे की, मागच्या निवडणुकीत मला आधार करण्यासाठी तो निवडणूक प्रचारात उतरला होता. त्याचे नगरसेवकांबरोबर चांगले संबंध असल्याने आपण मागच्या निवडणुकीत त्याच्यावर काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्या त्याने चांगल्या प्रकारे पार पाडल्या. आताही आपणास सहाय्य करण्यासाठीच तो आपल्याबरोबर फिरत आहे, असेही कामत म्हणाले. राजकारणात येण्यासाठी संघर्ष करावा लागतो. लोकांची साथ लाभावी लागते. तसेच कार्यकर्त्यांचा निर्णय महत्वाचा असतो. जर योगीराजने राजकारणात यायचे झाल्यास कार्यकर्ते निर्णय घेतील, असेही दिगंबर कामत म्हणाले.
कोणाला मंत्री करायचे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार
10 मे पर्यंत मंत्रीमंडळात फेरबदल केला जाणार असल्याचे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले होते. त्याप्रमाणे मंत्री मंडळात फेरबदल होईल का? आपली मंत्रीमंडळात वर्णी लागणार का? असा सवाल केला असता कामत म्हणाले की, मंत्रीमंडळात फेरबदल करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्रीच काय तो निर्णय घेतील.









