प्रतिनिधी
बांदा
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने कारवाई केली. या कारवाईत 3 लाख रुपयांची दारू व 10 लाख रुपयांची गाडी असा एकूण 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कालापला राजेश वय 40 व अप्पानी रसी किरण वय 26 ( दोघेही रा आंध्रप्रदेश ) यांच्यावर कारवाई केली. ही कारवाई शुक्रवारी सकाळी इन्सुली तपासणी नाका येथे करण्यात आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोव्याहून येणाऱ्या वाहनांची इन्सुली तपासणी नाका येथे तपासणी होत होती दरम्यान गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने जाणारे (एपी२१एइ०१११) आले असता येथील कर्मचारी यांनी गाडीला तपासणीसाठी थांबण्याचा इशारा केला. गाडीची तपासणी केली असता त्यात मोठया प्रमाणात दारू साठा असल्याचे समोर आले. यामध्ये चक्क सहाशे दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
ही कारवाई इन्सुली तपासणी नाका निरीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरिक्षक तानाजी पाटील, प्रदीप रासकर, सहाय्यक दुय्यम निरिक्षक गोपाळ राणे, प्रसाद माळी, रणजित शिंदे यांच्या पथकाकडून करण्यात आली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर करीत आहेत.









