राजापूर :
गणेशोत्सवादरम्यान गोवंश वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत तालुक्यातील रायपाटण येथे दोन वाहनांमधून 19 गोवंशाची अवैध वाहतूक करताना तिघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 20 लाख 66 हजार ऊपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 19 गुरांची सुटका करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक व्ही. बी. महामुनी यांनी गणेशोत्सव काळात गोवंश तस्करीला आळा घालण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक गुरुवारी लांजा उपविभागात गस्त घालत असताना त्यांना ओणी ते पाचलमार्गे गोवंश वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी रायपाटण येथे पहाटे वाहनांची तपासणी सुरू केली. पहाटे 5.55 वाजता पोलिसांनी संशयावरून महिंद्रा कंपनीची जिनीओ मॉडेलची (एमएच 04 एफपी 6424) आणि पाठोपाठ आयशर (एमएच 07 एक्स 1511) ही दोन वाहने थांबवली. या वाहनांची तपासणी केली असता दोन्ही वाहनांमध्ये दाटीवाटीने बांधलेली एकूण 19 गुरे आढळून आली. त्यांना खाण्यासाठी चारा किंवा पिण्यासाठी पाणी न देता केवळ दोरीने बांधून वेदना होतील, अशा पद्धतीने ठेवण्यात आले होते. पोलिसांनी दोन्ही वाहनांच्या चालकांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे गोवंश वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नव्हता. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून गुरांची तपासणी केली नव्हती.
या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालक विनायक मनोहर भोईटे (38, रा. पांगरी, निपाणी, कर्नाटक) आणि समीर बाळासो मुजावर (31, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) यांना ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांनी ही गुरे तबरेज चांदनिया ठाकूर (रा. परटवली, ता. राजापूर) यांच्याकडून आणल्याचे कबूल केले. या प्रकरणी तीनही आरोपींविऊद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा 1960, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976, महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 आणि मोटार वाहन कायदा 1988च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही वाहनांसह सुमारे 20 लाख 66 हजार ऊपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक व्ही. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि त्यांच्या पथकाने बजावली. यात पोलीस उपनिरीक्षक ओगले, सहाय्यक पोलीस फौजदार गोटे, हवालदार झोरे, पालकर, राजवैद्य, कदम, सवाईराम, शेट्यो आणि कॉन्स्टेबल कांबळे यांचा समावेश होता.








