पुसेगाव/वार्ताहर
illegal gutkha transport: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, उपवभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या सूचनेनुसार पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन तसेच अवैध्य धंद्यांवर कारवाईचा बडगा सुरूच आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास पुसेगाव ता. खटाव येथील छ. शिवाजी चौकात अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी सुमारे ४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करून एकास ताब्यात घेतले असल्याची माहिती पुसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑल आऊट ऑपरेशन तसेच अवैध्य धंद्यांवर कारवाई करणेबाबत वरिष्ठांच्या आलेल्या सुचनेनुसार पुसेगाव परिसरात कसून तपास सुरू आहे. छ. शिवाजी चौक पुसेगाव येथे सपोनि शितोळे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे व सुधीर येवले तसेच इतर कर्मचारी ऑलआऊट ऑपरेशनची कारवाई करीत होते. सोमवार दि. १२ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सपोनि. शितोळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पुसेगाव ता. खटाव परिसरात मनोज पोपट कुंभार रा. चिमणगाव ता. कोरेगाव हा त्याचे महिंद्रा पिकअप क्र. MH 11 CH 0603 या गाडीतून बेकायदा बिगर परवाना गुटखा, पान मसालाची वाहतूक करीत होते. त्यानुसार सदर गाडीचा पुसेगाव परिसरात शोध घेत असताना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बुध रोडला मंगल वस्त्रनिकेतन समोरील रोडवर ती गाडी बुध बाजुकडे निघालेली दिसली. सदर गाडी चालकाकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यास ताब्यात घेऊन गाडीची झडती घेतली असता सदर गाडीत २५२०० /- रु.चा गुटखा व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ४,५०,०००/ रु. किंमतीची पिकअप गाडी असा एकूण ४,७५,२००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सपोनि शितोळे करीत आहेत. सदर कारवाई पो. हवा. चंद्रहार खाडे, आनंदा गंबरे, विपुल भोसले , विजय खाडे, सचिन जगतान सुनिल अबदागिरे वैभव वसव यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला.