भरणेत वनविभागाची कारवाई, दोन चालकांवर गुन्हा
खेड प्रतिनिधी
जंगलतोड केलेली लाकडे बेकायदेशीरपणे ट्रकमध्ये भरून मुंबईच्या दिशेने घेऊन जात असताना मुंबई-गोवा महामार्गावर भरणे येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत दोन ट्रक ताब्यात घेतले. या दोन ट्रकचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन ट्रकसह 19 लाख 30 हजार 102 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
ट्रक चालक अशोक किसन कुसाळकर (रा. सुकीवली), संकेत बळीराम चव्हाण (रा.भरणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जागरूक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मुंबईच्या दिशेने जंगली लाकडे घेऊन जाणारे 2 ट्रक तपासणीसाठी थांबवले असता जंगली लाकडे भरलेली आढळली. लाकूड वाहतुकीचा वनविभागाचा कोणताही परवाना चालकाकडे नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंगळवारी रात्रीच्या सुमारास जंगली लाकडे भरलेले दोन्ही ट्रक वनविभागाने ताब्यात घेतले.
बुधवारी पंचनामा केल्यानंतर वनविभागाने विनापरवाना जंगली लाकडाची वाहतूक करणारा ट्रक (एम.एच12/ एस. एफ 9393) व त्यामधील लाकडे अंदाजे 12 लाख 14 हजार 880 रुपये किमतीचे व दुसरा ट्रक (एम एच 08 ए पी . 7716) व त्यामधील लाकडे 7 लाख 15 हजार 227 आशा प्रकारे दोन्ही ट्रक मिळून 19 लाख 30 हजार 102 रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. जंगली लाकडे कुठून तोडून आणली, याचा तपास केला जाणार असून जागा मालकासह लाकूड व्यवसाय करणायावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे समजते. याबाबत वन विभागातील अधिकारी अधिक तपास करत आहेत.









