दीड लाखाचा तांदूळ जप्त : एकावर एफआयआर
बेळगाव : अन्नभाग्य योजनेतील तांदूळ साठवून ठेवणाऱ्या पिरनवाडी येथील एका रहिवाशावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री एका गोदामावर छापा टाकून 6,400 किलो तांदूळ साठा जप्त करण्यात आला आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार कार्यालयातील अन्न निरीक्षक सुरेश यल्लाप्पा उप्पार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय सुबराव भोसले, राहणार जांबोटी रोड, पिरनवाडी याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी अन्नभाग्य योजनेतील तांदूळ साठवून काळ्या बाजारात त्याची विक्री करण्याचा उद्देश होता. यासंबंधीची माहिती मिळताच रविवारी अधिकाऱ्यांनी पिरनवाडी येथील एका गोदामावर छापा टाकून गोदामात आढळून आलेल्या तांदळाविषयी कागदपत्रांची मागणी केली. संबंधितांकडे कसलीच कागदपत्रे उपलब्ध नव्हती. पोलिसांनी 1 लाख 47 हजार 200 रुपये किमतीचा 6 हजार 400 किलो तांदूळ जप्त केला आहे. अन्नभाग्य योजनेतील वाटप करण्यात आलेला तांदूळ असल्याची माहिती असूनही काळ्याबाजारात चढ्याभावाने त्याची विक्री करण्यासाठी पोत्यातून त्याचा साठा करण्यात आला होता. यासंबंधी संजय भोसले याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









