धान्याची लूट : गोरगरीब लाभार्थी संतप्त : अन्न-नागरी पुरवठा खात्याचे दुर्लक्ष
बेळगाव : अन्नभाग्य योजनेच्या रेशनमधील गैरप्रकार सुरूच आहेत. बेकायदेशीरपणे रेशन धान्याची पळवापळवी होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लाभार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. अशा बेकायदेशीर रेशन पळवापळवीला आळा घालणार का? असा प्रश्नही पडू लागला आहे. दारिद्र्या रेषेखालील जनतेला शासनाकडून मासिक धान्याचा पुरवठा केला जातो. मात्र काही रेशनदुकानदार मनमानीपणे रेशनची विक्री करत असल्याचे समोर येऊ लागले आहे. एकीकडे सर्वसामान्यांना धान्य कमी पडत आहे तर दुसरीकडे रेशनदुकानदार परस्पर धान्याची विक्री करत असल्याचे प्रकारही घडू लागले आहेत. त्यामुळे रेशनचे धान्य गोरगरीब जनतेसाठी की रेशन दुकानदारांना विक्रीसाठी? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा बेकायदेशीर धान्य विक्रीवर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे. हलगा येथील एका रेशन दुकानदाराने एक पोते धान्य परस्पर विक्री केल्याचा प्रकार घडला आहे. शिवाय हे पिशवीभर रेशनचे धान्य दुचाकीवरून घेऊन जातानाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. रेशनचा तांदूळ बाहेर विकणाऱ्यांवर कारवाई होणार का? हाच प्रश्न आता सर्वसामान्य लाभार्थ्यांतून विचारला जात आहे.









