कोर्टाच्या आदेशानुसार 113 शॅक्स होणार बंद : दहा पथकांकडून दिवसभर धडक कारवाई
म्हापसा : गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना न घेता कांदोळी किनाऱ्यावरील शॅक्सना टाळे ठोकण्याची प्रक्रिया काल सोमवारी सकाळपासून सुरू करण्यात आली. बार्देश तालुक्मयाचे मामलेदार प्रवीण गावस यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या कारवाईत तब्बल 113 शॅक्सना टाळे ठोकले जाणार आहेत. एकूण 10 पथके या कारवाईत सहभागी झाली आहेत. या मंडळाचा परवाना न घेताच चालविल्या जाणाऱ्या पर्यटन शॅक्सवर कारवाई करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिला होता. या आदेशानुसार 161 शॅक मालकांकडे मंडळाचा परवाना नसल्याने त्या शॅक्सना टाळे ठोकण्यात येणार आहेत. मात्र कोर्टाच्या या आदेशानंतर 48 शॅक्स व्यावसायिकांनी मंडळाकडून परवाने घेतले. उर्वरित 113 व्यावसायिकांनी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने त्यांना टाळे ठोकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती मामलेदार गावस यांनी दिली.
कारवाईसाठी दहा पथके
कारवाई करण्यासाठी 10 पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रत्येक पथकात मामलेदार प्रतिनिधी, पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा प्रतिनिधी, पर्यटन खाते, सीआरझेड तसेच इतर संबंधीत खात्याच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. या कारवाईत दुपारी 3 वाजेपर्यंत 30 हून जास्त शॅक्सना टाळे ठोकण्यात आले. त्यातील काही जणांकडून किरकोळ प्रतिकार झाला. पण एकूण प्रक्रिया शांततेत पूर्ण होत गेली. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जाईल अशी माहिती गावस यांनी दिली. पूर्ण प्रक्रियेसाठी कडक पोलीस बंदोबस्त असल्याची माहिती निरीक्षक दत्तगुऊ सावंत यांनी दिली. प्रक्रिया शांततेत व्हावी याची दखल घेतली जात असल्याचे ते म्हणाले.









