पुणे / वार्ताहर :
पुण्यात मागील काही वर्षांपासून अवैध सावकारी बोकाळत आहे. ही सावकारी मोडीत काढण्यासाठी अवैध सावकारांची कुंडली पुणे पोलिसांनी तयार केली असून, त्यांच्याविरोधात कारवाई सुरू केली आहे. एक लाखांच्या बदल्यात 6 लाख रुपये वसूल केल्यानंतर आणखी अडीच लाखांची मागणी करून त्यासाठी धमकी देणाऱ्या सावकाराला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे.
नागराज उर्फ नागेश रत्नाकर नायकोडी (वय 24, रा. शनीनगर जांभूळवाडी रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सावकाराचे नाव आहे. या प्रकरणी 35 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार आणि आरोपी सावकार हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तक्रारदार यांनी आरोपीकडून 15 टक्के व्याजदराने 1 लाख रुपये घेतले होते. त्याच्या बदल्यात त्यांनी ऑनलाईन आणि फोन पेद्वारे 5 लाख 95 हजार रुपये सावकाराला दिले होते. तरीही तक्रारदारास दंड आणि व्याजापोटी आणखी अडीच लाखांची मागणी केली जात होती. तक्रारदाराच्या घरात घुसून पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी सावकाराने दिली होती.
अधिक वाचा : फरार गुंड रुपेश मारणेला साथीदारासह अटक
याप्रकरणी अधिक चौकशी करुन पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39,45 नुसार गुन्हा दाखल केला आहे.









