कुडाळ :
महाराष्ट्र शासनाच्या नियमांची अवहेलना करत जावली तालुक्यातील रुईघर गावातील ग.नं. ४९७/अ भूखंड क्र. २२ वर अनाधिकृत गौणखनिज उत्खनन झाल्याचे समोर आले आहे. या उत्खननामुळे १९७ ब्रास दगड आणि गोट्यांचे उत्खनन करण्यात आले. ज्याची बाजारमूल्य ३,७४,३०० रुपये आहे. तसेच, रॉयल्टी म्हणून १,१८,२०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. यावर पाच पट दंड आकारणी केली गेली असून एकूण दंड रक्कम १९,८९,७०० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
तपासणीनुसार, या भूखंडावर अनधिकृतपणे उत्खनन केले गेले असून, त्या कारणामुळे संबंधित व्यक्तीवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या दंडाची एकूण रक्कम १९,८९,७०० रुपये झाली आहे. हे रक्कम संबंधित व्यक्तीने सात दिवसांच्या आत शासकीय खजिन्यात जमा करणे आवश्यक आहे.
मौजे रुईघर, ग.नं. ४९७/अ मधील भूखंड क्र. २२ येथे १९७ ब्रास दगड आणि गोट्याचे उत्खनन केले गेले. याविरुद्ध पंचनामा पथकप्रमुख तसेच निवासी नायब तहसिलदार यांनी पंचनामा करून संबंधित व्यक्तीला नोटीस दिली आहे. तपासानंतर, हे उत्खनन अनधिकृत असून, संबंधित व्यक्तीने कोणतीही परवानगी न घेता गौणखनिजाचे उत्खनन केले आहे.
सदर उत्खननावर दंड आकारणी करण्यात आलेली रक्कम संबंधित व्यक्तीला ७ दिवसांच्या आत शासकीय खजिन्यात जमा करावी लागेल. जर संबंधित व्यक्तीने दंडाची रक्कम न भरल्यास त्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
तपासाच्या पुढील टप्यात संबंधित व्यक्तीच्या मिळकतीवर बोजाची नोंद केली जाईल आणि सातबारा उताऱ्यात फेरफार केले जातील. सर्व संबंधित विभागांना या बाबतची माहिती सादर करण्यात आली आहे. यासंबंधी तहसिलदार हणमंत कोळेकर यांनी दिला आदेश, संबंधित व्यक्तीने त्वरित कारवाई करून दंडाची रक्कम जमा करावी असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.








