कोल्हापूर :
शहरातील संभाजीनगर येथे गोवा बनावटीच्या विदेशी दारुची तस्करी करणाऱ्या तरुणाला पकडले. गणेश चन्नाप्पा कलगुटगी (वय 24, रा. रेस कोर्स नाका, संभाजीनगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 5 लाख रुपये किंमतीची एक चारचाकी गाडी आणि 1 लाख 19 हजार 940 रुपये किंमतीची गोवा बनावटीची विदेशी दारु असा 6 लाख 19 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या जिल्हा भरारी पथकाने गुरुवारी मध्यरात्री केली.
शहरातील संभाजीनगरातून गोवा बनावटीच्या विदेशी दारुची चारचाकी गाडीतून वाहतुक होणार आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या जिल्हा भरारी पथकाचे निरीक्षक सदानंद मस्करे यांना बातमीदाराकडून मिळाली. त्यांनी त्यांच्या पथकातील दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे, अभयकुमार साबळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक कांचन सरगर, जवान विलास पोवार, धीरज पांढरे, विशाल भोई, सचिन लोंढे, प्रसाद माळी, साजीद मुल्ला याच्या मदतीने संभाजीनगरात गुरुवारी रात्री सापळा लावला. मध्यरात्री एक चारचाकी गाडी भरधावपणे येताना या पथकाला दिसली. या चारचाकी गाडीला संशयावरुन या पथकाने अडविली. या चारचाकीची तपासणी केली. यावेळी या चारचाकीमध्ये 1 लाख 19 हजार 940 रुपये किंमतीची गोवा बनावटीची विदेशी दारु आढळून आली. त्यावरुन चारचाकीचा चालक गणेश चन्नाप्पा कलगुटगी याला अटक करीत, त्याच्याकडून 1 लाख 19 हजार 940 रुपये किंमतीची गोवा बनावटीची विदेशी दारु असा 6 लाख 19 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.








