कणकुंबी तपास नाक्यावर 135 लिटर गोवा बनावटीची दारू जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
मारुती व्हॅनमधून बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या बीड जिल्ह्यातील दोघा तरुणांना अबकारी अधिकाऱ्यांनी गुरुवारी पहाटे अटक केली आहे. कणकुंबी तपास नाक्यावर ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याजवळून 135 लिटर गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. गोरक्षनाथ नवनाथ पन्नाळकर (वय 32, रा. नाळवंडी, ता. पाटोदा, जि. बीड), सुरेश गोरख मोघे (वय 30, रा. विश्वेश्वरनर, पिंपरगाव रोड, बीड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. सुरेश हा वाहनाचा चालक आहे. वाहन मालकाचा शोध घेण्यात येत आहे.
अबकारी विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, सहआयुक्त फिरोजखान किल्लेदार, उपायुक्त वनजक्षी एम. यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी उपअधीक्षक रवी मुरगोड, अबकारी निरीक्षक मंजुनाथ गलगली व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमेवर तपासणी वाढविण्यात आली आहे. एमएच 46 पी 4882 क्रमांकाच्या मारुती व्हॅनमधून गोवा बनावटीची दारू वाहतूक करण्यात येत होती. कणकुंबी तपास नाक्यावर व्हॅन अडवून तपासणी केली असता 15 बॉक्समधून वेगवेगळ्या कंपन्यांचा 135 लिटर दारूसाठा आढळून आला. वाहनासह जप्त दारूची किंमत 4 लाख 20 हजार 520 रुपयांइतकी होते.









